सातारा – संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सन २०२० -२१ व सन २०२१-२२ या दोन वर्षाच्या कालावधीत घेण्यात आलेल्या स्पर्धेत पात्र ठरलेल्या १५ ग्रामपंचातींची तपासणी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती शुक्रवारी (दि.२९) बनवडी (ता. कराड) गावास भेट देवून पाहणी करणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली.
या समितीत अध्यक्षांचे प्रतिनिधी म्हणून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अवर सचिव चंद्रकांत मोरे असून समिती सदस्यांचे प्रतिनिधी म्हणून कक्ष अधिकारी बाळासाहेब हजारे, सहाय्यक कक्ष अधिकारी रमेश पात्रे हे असणार आहेत. या स्पर्धेत पात्र ठरलेल्या बनवडी (ता. कराड), वाटंगी (ता. आजरा),निरवडे (ता. सावंतवाडी), परुळेबाजार (ता. वेंगुर्ला) या ग्रामपंचायतींची ही समिती तपासणी करणार आहे. गुरुवारी रात्री समिती कराड येथे दाखल होणार असून शुक्रवारी सकाळी 9 वाजता बनवडी येथे समिती भेट देणार आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत समिती बनवडी ग्रामपंचायतीत तपासणी करणार आहे.