मुंबई – देशभरासह राज्यातही करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. करोनाग्रस्त रुग्णांना वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अशातच मनसे नेत्याने एका करोना रुग्णाला उपचारानंतर रुग्णालयातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
माहितीनुसार, घाटकोपर परिसरातील एका व्यक्तीला करोनाची लागण झाली होती. या व्यक्तीची पत्नी मनसेच्या कार्यकर्त्या आहेत. करोना झाल्याने सदर व्यक्ती २१ मेपासून घाटकोपरच्या हिंदुसभा रुग्णालयात उपचार घेत होती. मात्र तब्येत खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात उपचारास दाखल करण्यात आले. १० दिवस आयसीयूमध्ये उपचार केल्यामुळे त्यांचे बिल दोन लाखाच्या जवळपास झाले होते. मात्र, हे बिल जास्त असल्याचा आरोप करीत मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या रुग्णाला करोना केंद्रातून पळवून नेले.
दरम्यान, याबाबत रुग्णालय प्रशासनाने घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.