पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बारामती लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 23 लाख 72 हजार 668 मतदारांपैकी एकूण 14 लाख 11 हजार 621 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण 59.50 टक्के आहे. मागील 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातून 61.54 टक्के मतदान झाले होते. यंदा यामध्ये दोन टक्के घट झालेली दिसत असली, तरी मतदानाच्या संख्येत मात्र 1 लाख 6 हजार 893 ने वाढ झालेली दिसून येत आहे.
या निवडणुकीत टक्केवारीत सर्वाधिक मतदान हे बारामती विधानसभा मतदारसंघातून झालेले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात 69.48 टक्के मतदान झाले. तर मतदारांच्या संख्येत 2 लाख 77 हजार 365 इतके मतदान झालेले आहे. त्यामुळे खडकवासला मतदारसंघातील मतदानाची आघाडी कोण घेते, यावरच बारामतीचा निकाल ठरणार आहे. एकंदर या मतदानाच्या आकडेवारीवरून बारामतीचा कौल कोणाच्या बाजूने राहणार हे 4 जूनला उघड होणार आहे.
पवार कुटुंबियांमध्येच ही निवडणूक होत असल्याने अपेक्षेप्रमाणे बारामतीमध्ये सर्वाधिक मतदान झाल्याचे दिसून आले. दोन्ही मतदार एकाच विधानसभा मतदारसंघातील असल्याने बारामती तालुक्यातून 69.48 म्हणजे 2 लाख 56 हजार 531इतके मतदान झाले आहे.
दौंड तालुक्यातून 1 लाख 83 हजार 658 मतदारांनी मतदान केले. तर इंदापूर तालुक्यातून 2 लाख 71 हजार 173 मतदान , पुरंदर मधून 2 लाख 31 हजार 679 मतदान, भोर-वेल्हा-मुळशी या तीन तालुक्यातून 2 लाख 45 हजार 215 मतदारांनी मतदान केले. तर खडकवासला हा शहरी भाग जास्त असलेला मतदारसंघ असून या मतदारसंघात 2 लाख 77 हजार 365 इतके मतदान झालेले आहे.
या निवडणुकीत महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी 56.36 टक्के तर पुरुष मतदारांच्या मतदानाची टक्केवारी 62.35 इतकी आहे. 7 लाख 74 हजार 383 पुरुष मतदारांनी तर 6 लाख 37 हजार 219 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी
विधानसभा मतदारसंघ- वर्ष 2014 – वर्ष 2019 – वर्ष 2024
दौंड – 58 टक्के – 64.05 टक्के – 60.29 टक्के
इंदापूर – 68 टक्के – 64.39 टक्के – 67.12 टक्के
बारामती- 58 टक्के – 70.24 टक्के – 69.48 टक्के
पुरंदर – 57.44 टक्के – 60.48 टक्के – 53.96 टक्के
भोर – 55.9 टक्के – 60.84 टक्के – 60.11 टक्के
खडकवासला – 50 टक्के – 53.20 टक्के – 51.55 टक्के
एकूण – 58.20 टक्के – 61.54 टक्के – 59.50 टक्के
बारामती लोकसभा मतदारसंघात झालेले मतदान
विधानसभा मतदारसंघ – एकूण मतदार – पुरुष मतदारांनी केलेले मतदान – महिला मतदारांनी केलेले मतदान – एकूण झालेले मतदान
दौंड – 3,04,607 – 1,02,381 – 81,277 – 1,83,658
इंदापूर – 3,23,541 – 1,18,407 – 98,761 – 2,17,173
बारामती – 3,69,217 – 1,38,127 – 1,18,398 – 2,56,531
पुरंदर – 4,29,351 – 1,28,529 – 1,03,148 – 2,31,679
भोर – 4,07,921 – 1,35,844 – 1,09,370 -2,45,215
खडकवासला – 5,38,031 – 1,51,095 -1,26,265 – 2,77,365
एकूण -23,72,668 – 7,74,383 – 6,37,219 – 14,11,621
बारामती लोकसभा मतदारसंघातील तुलनात्मक आकडेवारी
वर्ष 2019 मध्ये झालेले मतदान – वर्ष 2024 झालेले मतदान – फरक
13,04,728 – 14,11,621 – अधिक 1,06,893