पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरासह जिल्ह्यातील उन्हाचा पारा एक ते दोन अंशांनी घटल्यामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे, तर काही भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. बुधवारी (दि. 8) शहरातील कोरेगाव पार्क येथे सर्वाधिक 41.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, वाढते तापमान आणि ढगाळ वातावरण यामुळे पुढील तीन ते चार दिवसानंतर शहरात पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
मे महिन्याच्या पहिल्या दिवसांपासून उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. संपूर्ण आठवड्यात पारा तब्बल 43.7 अंशांवर जाऊन पोहोचला होता. त्यामुळे काही भागांत चटका सोसेनासा झाला होता. प्रामुख्याने ढमढेरे, कोरेगाव पार्क, वडगावशेरी, शिरूर, हडपसर, मगरपट्टा या भागांतील कमाल तापमान 43 अंशांच्या पुढे होते. त्यामुळे वाढत्या तापमानाने पुणेकर हैराण झाले आहेत. दरम्यान, मागील 24 तासांत शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमान 42 अंशांच्या खाली आले आहे. त्याचबरोबर वाढता उकाडाही काही प्रमाणात कमी झाला आहे.
पुढील दोन दिवस शहरातील कमाल तापमान 40 ते 41 अंशांच्या आसपास राहील, तर दिवसभर ऊन आणि दुपारनंतर आकाश ढगाळ राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. शिवाय दि. 12, 13 आणि 14 मे रोजी शहरासह जिल्ह्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाजही वेधशाळेने वर्तविला आहे.
शहरासह जिल्ह्यातील काही प्रमुख भागांतील कमाल तापमान
कोरेगाव पार्क – 41.8, वडगावशेरी – 41.6, ढमढेरे – 41.1, बालेवाडी – 41.1, शिरूर – 41, मगरपट्टा – 40.7, पुरंदर् – 40.2, हडपसर – 39.5, शिवाजीनगर – 39.4, पाषाण – 39.3, लोहगाव – 39.2, एनडीए – 39.1, इंदापूर – 38.8, आंबेगाव – 38.4, हवेली – 37.2, लवासा – 34.7, लोणावळा – 34.5