Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ९३ मतदारसंघांमध्ये नुकतेच मतदान पार पडले. यादरम्यान मतदान करणाऱ्या व्यक्तीला लाइव्ह स्ट्रीमिंग करणे महागात पडले आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील दाहोद येथे ही घटना घडली आहे. आरोपी हा भाजपचा नेता असल्याची माहिती समोर येत आहे. भाजप नेत्याने 7 मे रोजी ईव्हीएमद्वारे मतदान करताना लाईव्ह स्ट्रीमिंग केले. हा व्हिडिओ 8 मेला सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली.
भाजप नेत्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लाईव्ह स्ट्रीमिंग केले. यामध्ये तो ईव्हीएमद्वारे मतदान करत आहे. तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनाही तो शांतता राखण्यास सांगत आहे. या व्हिडिओचा संदर्भ घेत काँग्रेस उमेदवार डॉ.प्रभा ताविआड यांनी स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. फेरमतदानाची मागणीही त्यांनी केली आहे. काँग्रेसने येथे बूथ कॅप्चरिंगचा आरोप केला आहे.
यावर प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दोशी यांनी प्रश्न उपस्थित करत भाजपने जनतेचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला आहे. असा आरोप केला आहे. काल (7 मे) दिवसभर मतदारांना वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघात बूथवर पोहोचण्यापासून रोखले जात असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून थट्टा केली जात आहे. असेही ते म्हणाले आहे.
कोण आहे हा युवा नेता?
मिळालेल्या माहितीनुसार, विजय भाभोर नावाच्या युवा नेत्याने हा व्हिडिओ लाईव्ह केला होता. स्थानिक भाजप नेते रमेश भाभोर यांचा तो मुलगा आहे. रमेश भाभोर हे भाजपचे माजी तहसील अध्यक्ष राहिले असून सध्या ते स्थानिक भाजप आदिवासी मोर्चाचे उपाध्यक्षही आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आणि कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले. यानंतर स्थानिक पोलिसांनी आरोपीला अटक केली. निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.