नगर – सावेडी उपनगरातील तपोवन येथील सर्व्हे नं. 289 मध्ये असलेला कचरा डेपो इतरत्र हलवून, तेथे स्मशानभूमी, उद्यान व मल्टीपर्पज क्रीडा संकुल विकसित करण्यासंदर्भातील प्रस्तावास शिवसेनेचा विरोध आहे. हा भांडवली विषय आपत्ती काळात आयोजित तातडीच्या सभेत चर्चेला घेणे बेकायदेशीर असून, 29 जुलै रोजी होणाऱ्या सभेतील प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे केली आहे.
तपोवन येथील कचरा डेपोचे कामकाज व्यवस्थित सुरू आहे. या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व खतनिर्मिती प्रकल्प विकसित करण्यात यावा यासाठी मनपातर्फे तेथे रस्ते, पथदिवे अशी कोट्यवधी रुपये खर्चाचे कामे करण्यात आली आहेत. या भुखंडावर कचरा डेपोचे आरक्षण असताना ते कसे उठवले जाऊ शकते? तसेच कचरा कुंडीच्या जागेवर अमरधाम बांधून नगरकरांच्या भावना दुखावल्या गेल्या तर मनपा कारभाराबाबत नागरिकांत मोठा असंतोष निर्माण होऊ शकतो.
या भुखंडावर एक मल्टीपर्पज क्रीडा संकुल बांधण्याचा प्रस्ताव आहे. परंतू निधी अभावी सावेडीतील क्रीडा संकुल अद्याप बांधून झालेले नाही. चितळे रोड येथील नेहरू मार्केट पाडले, तेथेही मनपा निधी अभावी संकुल बांधू शकलेली नाही, असे असताना तपोवन सारख्या विरळ लोकवस्तीच्या भागात स्मशानभूमी व मल्टीपर्पज संकुल बांधण्याचा काय फायदा? त्यासाठी मनपाला पैसा कसा उपलब्ध होणार?. 20 जुलै रोजी मनपा विरोधीपक्षनेते यादी देतात. त्यात कचरा डेपो हटविण्याचा विषय येतो. 21 जुलै रोजी आयुक्त या विषयाला मंजुरी देतात व 22 जुलै रोजी नगर सचिव विभागाकडून काढण्यात आलेल्या 29 जुलैच्या सभेच्या अजेंड्यात हा विषय आंतरभुत केला जाता, या मागचे गौडबंगाल काय? हे आम्हाला ज्ञात आहे.