पुणे – करोनाचा संसर्गामुळे शहरातील सार्वजनिक कार्यक्रम, सभा, मोर्चा, निदर्शने, आंदोलनांवर घातलेली बंदी कायम आहे. शहरात पुढील चौदा दिवस प्रतिबंधात्मक आदेश लागू असून, नियमभंग केल्यास कारवाई करण्याचा इशारा सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे.
येत्या शुक्रवारी छत्रपती राजाराम जयंती, शनिवारी ( 1ऑगस्ट) लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि बकरी ईद आहे. दि.3 ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमा आणि दि.9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिन आहे. त्या पार्श्वभूमीवर या काळात घोषणाबाजी, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे.
शहरातील प्रतिबंधात्मक आदेश दि. 10 ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहेत. मिरवणुका काढण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. राज्यात दि.31 जुलैपर्यंत टाळेबंदी कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये तसेच पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.