प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांचे प्रतिपादन
हडपसर – सामाजिक प्रश्नांचे बारकावे माहीत असणारे शरद पवार हे लोकसिद्ध नेतृत्व आहे. गुणग्राहकता आणि स्मरणशक्तीचे वरदान लाभलेल्या या नेत्याने अनेक कार्यकर्त्यांना जी ऊर्जा दिली तीच ऊर्जा आज नवनिर्मितीला प्रेरक ठरत आहे. माणसं सांभाळायची हातोटी आणि कामाची चिकाटी ही पवार यांची स्वभाववैशिष्ट्य आहेत, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले.
एस. एम. जोशी महाविद्यालयात साधना शैक्षणिक संकुलाच्या वतीने आयोजित केलेल्या “कर्मवीर’ ऑनलाइन व्याख्यानमालेत “चैतन्याचा महामेरू: शरद पवार’ या विषयावर प्राचार्य डॉ. पाटणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पश्चिम विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी एस.टी. पवार होते.
प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनीही मनोगत व्यक्त केले. या ऑनलाइन व्याख्यानाला सुजाता कालेकर, लक्ष्मी आहेर, तमन्ना सय्यद, झीनत सय्यद यांच्यासह साधना शैक्षणिक संकुलाचे शाखाप्रमुख, उपप्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे, डॉ. एम. आर.जरे उपस्थित होते.
सूत्रसंचालन डॉ. शकुंतला सावंत यांनी केले. प्राचार्य विजय शितोळे यांनी आभार मानले.