सातारा – जिल्ह्यातील 133 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लागली आहे. त्यामधील तब्बल 42 ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या, तर 24 ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 64 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक, तर 14 गावांत निवडणूक लागली आहे. या ग्रामपंचायतींसाठी उद्या, रविवारी (दि.5) मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून पोलीस दलातर्फे संवेदनशील मतदार केंद्रांवर बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने निर्माण झालेल्या 133 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली आहे. त्यातील तब्बल 42 ग्रामपंचायतींमध्ये पूर्णत: बिनविरोध, तर 24 ग्रामपंचायतीत अंशत: बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे या संबंधित ग्रामपंचायतींमध्ये पुढील मतदान प्रक्रिया होणार नाही.
उर्वरीत गावांमध्ये गावगाड्याची सत्ता मिळवण्यासाठी राजकीय रणधुमाळी सुरु आहे. सध्या 64 ग्रामपंचायतींसाठी तसेच 14 गावांमध्ये सरपंच/ सद्स्य पदासाठी पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार आहे. 78 ग्रामपंचायतीत 237 मतदान केंद्रावर ही प्रक्रिया होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी तसेच मतदानावर परिणाम होवू नये, यासाठी मतदान केंद्रालगत भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच मतदान करता यावे, यासाठी संबंधित मतदारांना स्थानिक सुट्टी द्यावी अथवा दोन तासांची सवलत द्यावी, असे आदेश विविध आस्थापनांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.