पुणे : बारामती मतदार संघातील निवडणूक मंगळवारी शांततेत पार पडली. किरकोळ प्रकार वगळता कोणतीही अनुचित घटना घडली नाही, अशी माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. बारामती मतदार संघात तीन हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बारामती मतदारसंघात इंदापूर, दौंड, सासवड, भोर, खडकवासला विधानसभा मतदार संघात मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. संवेदनशील मतदार संघात अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकारी बंदोबस्तास होते.
सुरक्षेच्या कारणास्तव संवेदनशील मतदान केंद्राची बाँम्ब शोधक नाशक पथकाकडून तपासणी करण्यात आली. मतदान केंद्रांच्या परिसरात निर्बंध लागू करण्यात आले होते. ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने बारामती लोकसभा मतदार संघाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.
पुणे शहरातील वारजे, नऱ्हे, धायरी या भागाचा समावेश बारामती मतदारसंघात होतो. पुणे शहर पोलिसांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रात बंदाेबस्त तैनात केला होता.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस अधीक्षक, ८ उपअधीक्षक, २२५ पोलीस अधिकाऱ्यांसह दोन हजार ९५३ पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे एक हजार ६०० जवान, निमलष्करी दलाच्या ९ तुकड्या असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.