T20 Cricket (Japan vs Mongolia) : सध्या आयपीएल 2024 मध्ये संघ मोठी धावसंख्या बनवत आहेत, परंतु आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक संघ केवळ 12 धावांवर ऑलआऊट झाला आहे. नुकत्याच झालेल्या जपान विरुद्ध मंगोलिया सामन्याचे हे प्रकरण आहे. मंगोलियन क्रिकेट संघाने केवळ 7 महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. याआधी मंगोलियन संघ प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळताना दिसला. जपानविरुद्धच्या सामन्यात मंगोलिया अवघ्या 12 धावांवर बाद झाला, जी टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यासह जपानने हा सामना 205 धावांच्या फरकाने जिंकला आहे. याआधी एक संघ केवळ 10 धावसंख्येवरच सर्वबाद झाला होता.
मंगोलिया 12 धावांत सर्वबाद…
मंगोलियन संघ सध्या जपानच्या दौऱ्यावर आहे. त्यांच्यामध्ये 7 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात प्रथम खेळताना जपानने 20 षटकात 7 गडी गमावून 217 धावा केल्या होत्या. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मंगोलियन संघाची डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट पडली. एकामागून एक सर्व खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले आणि 11 खेळाडूंपैकी 7 खेळाडू एकही धाव काढू शकले नाहीत. जपानसाठी डावखुरा वेगवान गोलंदाज काझुमा काटो-स्टाफोर्डने 3.2 षटकात केवळ 7 धावा देत 5 बळी घेतले.
मंगोलियासाठी क्रिकेटचा प्रवास आहे संघर्षमय…
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा प्रवास मंगोलियन संघासाठी चांगला राहिलेला नाही. मंगोलियाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला सामना 27 सप्टेंबर 2023 रोजी खेळला गेला. त्या सामन्यात प्रथम खेळणाऱ्या नेपाळने 20 षटकात 314 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मंगोलियाचे खेळाडू अवघ्या 41 धावांवर सर्वबाद झाले. त्यांच्या दुसऱ्या सामन्यातही त्यांना मालदीवकडून 9 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.