शिवकाशी – तामिळनाडूच्या शिवकाशीजवळ फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच महिलांचाही समावेश आहे. विरूधुनगर जिल्ह्यात ही घटना घडल्याची माहिती जिल्हाधिकारी जयसेलन यांनी दिली.
स्फोटामुळे लागलेल्या आगीत अन्य १२ जणही भाजून जखमी झाले आहेत. स्फोट नेमका कशामुळे झाला याची चौकशी केली जाते आहे. शिवकाशी हे ठिकाण भारतातील सगळ्यांत मोठे फटाका निर्मितीचे केंद्र आहे.
देशातील फटाके, आगपेटी आणि स्टेशनरीच्या उत्पादनात शिवकाशीची भागिदारी सगळ्यांत जास्त आहे. सेंगमलापट्टी भागात स्फोट झाल्याची माहिती देण्यात आली आहे. गुरूवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास फॅक्टरीत स्फोटाचा मोठा आवाज झाला आणि त्यात अनेक जण जखमी झाले. जखमींना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले.
स्फोटानंतर अनेक कामगार आत अडकून पडले असल्याची माहिती असून त्यांच्या सुटकेचे काम सुरू आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात तामिळनाडूच्याच रामुथेवनपट्टी येथे फटाका कारखान्यात स्फोट झाला होता आणि दहा जणांचा त्यात बळी गेला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अशाच दुर्घटनेत १४ जणांना प्राण गमवावे लागले होते.