राहुरी – म्हैसगाव येथे लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ठरावा दाखल करण्यात आला होता. त्यावर आज ग्रामसभा घेवून गुप्त मतदान घेण्यात आले. यावेळी 2 हजार 277 मतदारांपैकी 1 हजार 479 मतदारांनी मतदान केले. मतमोजणीत ठरावाच्या बाजूने 756 मते, तर ठरावाच्या विरोधात 640 मते पडली. 83 मते बाद झाली. त्यामुळे सरपंच महेश गागरे यांच्यावरील अविश्वास ठराव बहुमताने संमत झाला. लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ठराव दाखल करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.
म्हैसगाव येथे लोकनियुक्त सरपंच महेश गागरे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला होता. लोकनियुक्त सरपंचाविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याने जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले होते. तेथील लोकनियुक्त सरपंच गागरे यांच्यावर
सहा सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. त्यानुसार गावात आज सकाळी तहसीलदार फसुऊद्दीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. यावेळी या ठरावावर गुप्त मतदान घेण्याचा निर्मय घेण्यात आला. सकाळपासून मतदानाला मतदारांची प्रचंड गर्दी झाली होती. पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांच्यासह पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार शेख यांनी काम पाहिले, तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी गोविंद खामकर यांनी सहकार्य केले. तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली होती.
त्यात थेट जनतेतून गागरे यांची सरपंचपदी निवड झाली होती. तसेच त्यांच्या पॅनेलचे बहुमताने सदस्य निवडून आले होते. अडीच वर्षांनंतर लोकनियुक्त सरपंचाने मनमानी कारभार केल्यास त्याच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याची कायद्यात तरतूद आहे. त्यानुसार विरोधी सदस्यांनी 23 सप्टेंबर रोजी गागरे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित केला. मात्र विशेष ग्रामसभेत गुप्त मतदान घेवून लोकनियुक्त सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव पारित झाल्याशिवाय सरपंचपद रद्द ठरविता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. त्यानुसार ग्रामसभा घेवून ही मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. ग्रामसभेला शंभर लोकांची उपस्थिती असणे आवश्यक होते. मतदार यादीनुसार उपस्थित ग्रामस्थांचे सकाळी साडेदहा वाजेपर्यंत नाव नोंदणी करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेतील दोन केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. दुपारी एक वाजेपर्यंत मतदान पूर्ण झाले. लगेचच मतमोजणी करण्यात आली. त्यात सरपंच गागरे यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या बाजूने जास्त मते मिळाली.
लोकनियुक्त सरपंच महेश गागरे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्याने सरपंचपदाचा तात्पुरता कार्यभार उपसरपंच सागर दुधाळ यांच्याकडे देण्यात आला आहे. पुढील सरपंच निवड होईपर्यंत तेच सरपंचपदाचा कार्यभार सांभाळतील.
फसुऊद्दीन शेख
तहसीलदार, राहुरी