सोलापूरच्या उपमहापौरांना सोडणे सांगवी पोलिसांना भोवले

उपनिरीक्षक निलंबित : वरिष्ठ निरीक्षकांची तडकाफडकी नियंत्रण कक्षाला बदली

पिंपरी – फसवणूक प्रकरणी ताब्यात घेतलेल्या सोलापूर महापालिकेच्या उपमहापौराला सोडून देण्यात आले. या प्रकरणी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सांगवी पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे यांना नियंत्रण कक्षात बदली केली असून उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे यांना निलंबित केले आहे.

राजेश दिलीप काळे (वय 42, रा. सोलापूर) असे नोटीस देऊन सोडलेल्या सोलापूरच्या उपमहापौराचे नाव आहे. आरोपी काळे याने पिंपळे-निलख येथील एक फ्लॅट त्याने बनावट कागदपत्रे तयार करून अनेकांना विकला. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यातील पथकाने 29 मे रोजी काळेला सोलापूर येथून ताब्यात घेतले होते.

मात्र, शनिवारी (ता. 30) अचानक काळे यांना शिंका येऊ लागल्या. त्यामुळे त्यांना पुन्हा तपासासाठी हजर राहण्याची नोटीस देऊन सोडण्यात आल्याचे सांगवी पोलिसांनी सांगितले होते. या प्रकरणात हलगर्जीपणा आढळल्याने कारवाई करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.