कोपरगाव (प्रतिनिधी) : कोपरगाव शहरातील सेवानिकेतन शाळेच्या परिसरातील एका महिला डॉक्टरला गुरूवारी रात्री करोना विषाणुची लागण झाल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने कोपरगाव मध्ये खळबळ उडाली. करोना मुक्त तालुका असल्याने नागरीक व प्रशसन निश्चित होते पण राहता तालुक्यातील मामाने डॉक्टर भाचीला कोपरगावला येवून करोनाचा वानवळा दिला.
बाधित महिला डॉक्टरच्या घरात दु:खद घटना घडल्याने अंत्यविधीसाठी लोणी तालुका राहता येथून मामा भाचीच्या सांत्वनासाठी आले. एक दिवस कोपरगावमध्ये थांबुन निघून गेले. त्यानंतर मामा करोनाबाधित असल्याचे उघड झाल्यानंतर कोपरगावच्या दु:खीत कुटुंबावर पुन्हा दुःखाचे सावट गडद झाले. मामाच्या संपर्कातील व अंत्यविधीसाठी आलेल्यांची वैद्यकीय तपासणी केली असता महिला डॉक्टरचा अहवाल करोनाबाधित असल्याचा निष्पन्न झाले.त्यामुळे करोनाबाधित महिला राहत असलेला कोपरगाव शहरातील परिसर स्थानिक प्रशासनाने सील करुन बाधित महिलेचा आठदिवसाचा दैनंदिन जीवनप्रवास तपासून चौकशी केली. त्यानंतर बाधित महिलेच्या व मामाच्या संपर्कात कोपरगावचे ३० लोक आल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, बाधित महिला डॉक्टरच्या रुग्णालयात बाधित काळात, तपासणी व उपचारासाठी आलेल्या रुग्णांसह तेथे काम करणारे कर्मचारी त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. करोनाची बाधा इतरांना होवू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. सेवानिकेतन शाळा परिसर, राममंदिर रोड लक्ष्मीनगरचा काही भाग छत्रपती संभाजी महाराज सर्कल पासुन सील केला असून त्या भागातील नागरीकांना प्रशासनाच्या देखरेखेखाली अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येत आहे.
दरम्यान करोनाची लागण झालेल्या महिला डॉक्टरला जरी करोनाची लागण झाल्याचा वैद्यकीय अहवाल आला असला तरी त्यांना शाररीक कोणताच त्रास नसुन प्रकृती ठणठणीत आहे. सर्दी, खोकला, घशात खवखव करणे ताप यापैकी कोणताच त्रास नाही. तरीही त्या करोनाबाधित असल्याने संपुर्ण वैद्यकीय यंत्रणा विचारत पडली आहे. बाधित महिलेच्या घरातील सर्व नातलगाचे व बाधित मामाच्या घरातील सर्व सदस्यांची वैद्यकीय तपासणी केली असता करोना निगेटिव्ह अहवाल आले आहेत. त्यामुळे बाधित महिलेसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घशातील स्त्रावचे नमुने फेर तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठविणार असल्याची माहीती तहसीलदार चंद्रे यांनी दिली आहे.