1. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा फिस्कटली दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र येत असल्याची चर्चा सुरू असताना आता त्यामध्ये ट्विस्ट आला आहे. दोन्ही राष्ट्रवादीची संभाव्य युती आता जवळपास फिस्कटल्याची माहिती आहे. घड्याळ की तुतारी, कोणत्या चिन्हावर लढायचं यावरुन ही युती फिस्कटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तातडीने महाविकास आघाडीच्या बैठकीत उपस्थिती लावत चर्चाही सुरू केली आहे. त्यामुळे पुण्याचं राजकारण आता वेगळ्याच वळणावर पोहोचल्याचं दिसतंय. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू होती. वरिष्ठ स्तरावरून त्याला मान्यताही देण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठकही पार पडली. परंतु चिन्हाच्या अडचणीमुळे मात्र ही युती फिस्कटल्याची माहिती आहे. 2. आई एकवीरा देवीचे दागिने अन् रोकडची चोरी महाराष्ट्राची कुलदैवत मानल्या जाणाऱ्या कार्ला आई एकवीरादेवी देवस्थान ट्रस्टमध्ये गंभीर गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप याठिकाणचे पुजारी गणेश देशमुख यांनी केलाय. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर कोट्यवधी रुपयांची अफरातफर, देवस्थानची गाडी खासगी व राजकीय वापरासाठी वापरणे, तसेच देवीला दान स्वरूपात मिळालेल्या सोन्या- चांदीच्या वस्तूंवर डल्ला मारल्याचे आरोप करण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर व्हीआयपी दर्शनासाठी बनावट पावत्या छापून रोखीने पैसे उकळले जात असल्याचा गंभीर दावा पुजाऱ्यांनी केला असून, याबाबत पुणे धर्मदाय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली असून यामुळे कार्ला परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 3. एक लाख द्या आणि आम्ही अर्ज भरून देऊ राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर घडामोडींना वेग आला. अशातच इच्छुक उमेदवारांनी देखील चाचपणी, बैठका, मुलाखती दिल्या. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणूक अर्ज भरून हवा असल्यास 1 लाख रुपये किंमत मोजावी लागत आहेत. एक लाख द्या आणि आम्ही अर्ज भरून देऊ असेल अनेक वकिल्यांच्या घरासमोर बोर्ड लावण्यात आले आहेत. त्याचं कारण म्हणजे पालिका निवडणूक लढवणाऱ्यांना 21 पानांचा अर्ज भरावा लागणार आहे. हा अर्ज किचकट असल्याचं इच्छुकांच मत आहे. त्यात अर्ज बाद झाल्यानंतर अपील करता येणार नाही. त्यामुळे हा अर्ज तर काळजीने भरावा लागणार आहे. त्यासाठी वकिलांकडे इच्छुकांची गर्दी झाली आहे. इच्छुक उमेदवार जाणकारांना उमेदवारी अर्ज भरायचे एक लाख रुपये देत आहेत. या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढताना दिसत आहे. 4. भाजपला 128 पैकी 125 जागा मिळतील एकेकाळी अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्येभाजपचा मोठा विजय होईल, भाजपला 128 पैकी 125 जागा मिळतील असा दावा आमदार शंकर जगताप यांनी केला. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला फायदा होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, उर्वरित कोणत्या तीन जागा या अजितदादांची राष्ट्रवादी जिंकणार या प्रश्नाचं उत्तर देणं मात्र त्यांनी टाळलं. राहुल कलाटे यांच्या प्रवेशामुळे पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांना मोठा धक्का बसला असून भाजपची ताकद वाढल्याचं चित्र आहे. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि विद्यमान आमदार शंकर जगताप यांच्या विरोधात राहुल कलाटे यांनी निवडणूक लढवली होती. 5. ठाण्यात भाजपाच्या प्रचाराला सुरुवात ठाणे महानगरपालिका निवडणुकीचा पार्श्वभूमीवर भाजपाने अखेर प्रचाराला सुरुवात केलीये… संपुर्ण ठाण्यात जवळपास १६ ठिकाणी ठाणे भाजपाच्यावतीने बॅनरबाजी करण्यात आलीये… “नमो भारत, नमो ठाणे” या शिर्षकाखाली हे बॅनर लावण्यात आलेत… विकास यांचं सोबत विविध केंद्रीय आणि राज्य योजनांचा उल्लेख या बॅनरवर असून एक प्रकारे ठाणे भाजपाने निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकलय… शिवसेनेकडून अजून अंतिम प्रस्ताव आला नसल्याने आणि प्रचाराकरता थोडाच वेळ उरल्याने भाजपाने स्वतंत्र प्रचार सुरु केलाय यांवर आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येतेये ते पहावं लागेल. 6. व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळणार २० लाखांचे लोन बिझनेस सुरु करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु अनेकदा पुरेसे भांडवल नसल्याने तुम्ही बिझनेस सुरु करु शकत नाही. पण अशाच स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सरकारने एक खास योजना सुरु केलीय. या योजनेत तुम्हाला २० लाखांपर्यंतचे लोन मिळते. पीएम मुद्रा योजनेत लहान व्यापाऱ्यांना लोन दिलं जातंय. या योजनेत मिळणाऱ्या रक्कमेची मर्यादा डबल करण्यात आलीय. या योजनेत आता २० लाखांचे लोन मिळणार आहे. त्यानुसार शिशु लोनअंतर्गत ५० लाखांच , किशोर लोनमध्ये ५०,००० ते ५ लाख रुपयांपर्यंत लोन मिळतंय. तरुण लोनअंतर्गत ५ ते १० लाखांचे लोन दिलं जाणार तर तरुण प्लस कॅटेगरीसाठी तुम्हाला १० ते २० लाखांपर्यंत लोन दिलं जातय. 7. पाकिस्तान आता हायपरसोनिक तंत्रज्ञानाचा पाठलाग करतोय काँग्रेस नेते शशी थरूर यांनी देशाला इशारा देत भारत पाकिस्तानच्या बदलत्या लष्करी रणनीतीकडे दुर्लक्ष करू शकत नाही, विशेषतः हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रणालींवरील त्यांचे लक्ष असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या वाढत्या प्रभावाबद्दल आणि त्यांच्या वाढत्या भारतविरोधी कट्टरतावादाबद्दल भाष्य केले. “भारताने पाकिस्तानसोबतच्या भूतकाळातील अनुभवांमधून धडे घेतले आहेत आणि म्हणूनच आपण पूर्णपणे तयार असले पाहिजे” असं भाष्य देखील त्यांनी केलं. तसेच शशी थरूर यांनी, “ड्रोन, रॉकेट आणि क्षेपणास्त्रांनंतर पाकिस्तान आता हायपरसोनिक तंत्रज्ञानाचा पाठलाग करत आहेत. ते त्यांची लष्करी रणनीती बदलत आहेत, म्हणून आपण हे हल्ल्यात घेऊ शकत नाही. 8. वोलोदिमिर झेलेन्स्की-डोनाल्ड ट्रम्प यांच्यात भेट युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की रविवारी फ्लोरिडामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. यामुळे रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याची आशा पल्लवित झाल्यात. या भेटीत युक्रेनसाठी सुरक्षा हमींवर चर्चा होईल असे झेलेन्स्की यांनी सांगितले. तसच २० कलमी शांतता योजना लवकरच अंतिम केली जाईल असही त्यांनी सांगितलय. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील ही बैठकअसा वेळी होतीय ज्यावेळी अमेरिका हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला झेलेन्स्की यांनी जर रशियाने पूर्व औद्योगिक क्षेत्राच्या काही भागातून आपले सैन्य मागे घेतले तर युक्रेनही असेच करण्याचा विचार करेल असं म्हटलं होतं. त्यामुळे उद्या होणारी ही बैठक महत्वाची ठरणार आहे. 9. भारताचा तिसऱ्या टी 20 सामन्यात श्रीलंकेवर दणदणीत विजय भारतीय महिला क्रिकेट संघानं वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तोच फॉर्म टी 20 मध्ये देखील कायम ठेवलं आहे. भारतानं श्रीलंकेला तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये 8 विकेटनं पराभूत केलं आहे. तिसरी टी 20 मॅच तिरुअनंतपुरम येथे खेळवली गेली. या मॅचमध्ये भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला 112 धावांवर रोखलं. भारतानं हे आव्हान 14 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतानं 3-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे. शफाली वर्मा हिनं 42 बॉलमध्ये 79 धावांची वादळी खेळी करत भारताला मोठा विजय मिळवून दिला. पाच टी 20 सामन्यांची मालिका 30 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. भारतानं पहिल्या तीन सामन्यात विजय मिळवला आहे. भारतानं पहिली टी 20 मॅच 8 विकेटनं जिंकली, दुसरी टी 20 मॅच 7 विकेटनं जिंकली तर तिसरी मॅच 8 विकेटनं जिंकली आहे. 10. लाईव्ह शोमध्ये कैलाश खेर चाहत्यांवर संतापले 2025मध्ये गाण्याचे अनेक लाईव्ह शो झाले. काही हिट झाले तर, काही शोमध्ये चेंगराचेंगरी आणि गोंधळ उडण्याचे प्रकार घडले. नुकतंच सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचा ग्वाल्हेरमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट पार पडला. हा कॉन्सर्ट गुरूवारी पार पडला. मात्र, या कॉन्सर्टमध्ये मिठाचा पडला. रात्री कॉन्सर्टमध्ये चाहत्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. चाहत्यांनी घातलेल्या गोंधळानंतर कैलाश खेर प्रचंड संतापले. परिणामी कार्यक्रम तातडीने थांबवण्यात आला. हा शो अर्ध्यातच थांबला.तसेच चाहत्यांना खडेबोल सुनावले. ‘आम्ही प्रेक्षकांचा आदर करतो. पण तुम्ही जनावरांसारखं का वागताय? कृपया असं करू नका.. असं वागू नका. जर कुणीही स्टेजवर किंवा वाद्यांच्या जवळ आले तर, आम्ही लगेच कार्यक्रम थांबवू’, असं कैलाश खेर म्हणाले.