नवी दिल्ली : काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकासह तीन विधेयके लोकसभेत सादर केली. लग्नानंतरही एखाद्या महिलेचा आपल्या शरीरावर पूर्ण अधिकार असला पाहिजे आणि कायद्याने हे मान्य केले पाहिजे. भारताने आपल्या संवैधानिक मूल्यांचे पालन केले पाहिजे असे थरूर यांनी म्हटले आहे. केरळमधील तिरुअनंतपुरम येथील खासदार असणाऱ्या थरूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये म्हटले की वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवले पाहिजे. भारताने आपल्या संवैधानिक मूल्यांचे पालन केले पाहिजे आणि नाही म्हणजे नाही वरून फक्त हो कडे जावे. वैवाहिक संबंधात प्रत्येक महिलेला शारीरिक स्वायत्तता आणि सन्मानाचा मूलभूत अधिकार असला पाहिजे. वैवाहिक बलात्कार हा विवाहाविषयी नसून हिंसाचाराबद्दल आहे. आता कृती करण्याची वेळ आली आहे. शशी थरूर यांनी आणखी दोन खाजगी सदस्य विधेयके सादर केली. या दोन विधेयकांपैकी पहिले विधेयक राज्यांच्या पुनर्रचनेसाठी स्थायी आयोगाशी संबंधित आहे. त्याचे प्राथमिक उद्दिष्ट डेटा, जनगणना डेटा, आर्थिक व्यवहार्यता, राष्ट्रीय एकता आणि जनमताच्या आधारे नवीन राज्यांची निर्मिती किंवा विद्यमान राज्यांच्या सीमा बदलण्याबाबत भविष्यातील कोणताही निर्णय घेणे आहे. थरूर यांनी सादर केलेले तिसरे खाजगी सदस्य विधेयक काम करणाऱ्या लोकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. त्यांनी या विधेयकाला राइट टू डिस्कनेक्ट असे नाव दिले आहे. त्यांच्या पोस्टमध्ये थरूर यांनी लिहिले की, भारतातील ५१ टक्के लोक आठवड्यातून ४९ तासांपेक्षा जास्त काम करतात. त्याच वेळी, ७८ टक्के लोक बर्नआउटचा म्हणजे सततच्या कामामुळे आलेल्या तणावाचा आणि थकव्याचा त्रास सहन करतात. कामाचे तास मर्यादित करण्यासाठी डिस्कनेक्ट करण्याचा अधिकार कायदेशीर करण्यासाठी आपण काम केले पाहिजे.