भाजपाला मत म्हणजे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना मत

पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-मित्रपक्षांच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी बुधवारी (दि. 15) वाकड भागात नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या प्रचारासाठी खासदार श्रीरंग बारणे हे मैदानात उतरले आहेत. चिंचवडमधील जनता सूज्ञ आहे. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या विकासाला ते मत देतील आणि अश्विनी लक्ष्मण जगताप यांना एक लाखाच्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, माजी उपममहापौर झामाबाई बारणे, नानी घुले, भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात, शिवसेनेचे माजी नगरसेवक निलेश बारणे, करिष्मा बारणे, सुरेश राक्षे यांच्यासह भाजप व मित्रपक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपा आणि मित्रपक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करावे. दिवंगत लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहण्याची हीच खरी वेळ आहे. जनतेने अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अश्विनी लक्ष्मण जगताप म्हणाल्या, माझ्या पतीची आज जयंती होती. त्यांच्या आठवणी कधीच माझ्या मनातून जाणार नाहीत. आज जयंती असूनही ते दुःख बाजूला सारून प्रचारात उतरले आहे. त्यांच्या विकासाचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी साथ द्यावी आणि भाजपाच्या कमळ चिन्हावर मतदान करून मला विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.





