कीव : युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की हे रशियाबरोबरचे युद्ध थांबवण्यासाठी आता अखेरचा पर्याय म्हणून नाटो सदस्यत्वाबाबतचा आग्रह सोडून देण्याचा विचार करू लागले आहेत. युक्रेनच्या बाजूने अमेरिका आणि युरोपातल्या देशांनी वाटाघाटी करण्यावर रशियाने यापुर्वीच आपली नाराजी व्यक्त केली आहे. युक्रेनला हवी असलेली सुरक्षेची गॅरंटी रशियाकडून मिळण्याची शक्यता नाही. मात्र अमेरिका आणि युरोपातल्या देशांच्या गॅरंटीच्या आधारे तडजोड मान्य करण्याचा विचार झेलेन्स्की करत आहेत. झेलेन्स्की यांनी रविवारी बर्लिनमध्ये जर्मनीचे चांन्सेलर आणि स्टीव्ह विटकॉफ यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी युद्धबंदीच्या संभाव्य पर्यायांबाबत चर्चा करण्यात आली. या महत्वाच्या बैठकीच्यावेळी युरोपातल्या अनेक देशांचे राष्ट्रीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार देखील उपस्थित होते. पाच तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या बैठकीत २०-कलमी शांतता योजना, आर्थिक कार्यक्रम आणि इतर बाबींवर सखोल चर्चा झाली आणि त्यात बरीच प्रगती झाली, असे अमेरिकेच्या शिष्टमंडळाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. आज सोमवारी देखील ही चर्चा पुढे सुरू राहणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक वर्षांपासून युक्रेनने नाटोचे सदस्यत्व मिळण्याचा आग्रह कायम ठेवला होता. मात्र आता हा आग्रह सोडून देण्याचा विचार झेलेन्स्की करत आहेत. त्याचे कारण म्हणजे युक्रेन आणि अमेरिकेमध्ये द्विपक्षीय संरक्षण सहकार्याचा करार झाला आहे. नाटोच्या सदस्यत्वाप्रमाणेच युक्रेनला या द्विपक्षीय कराराद्वारे संरक्षणाची हमी मिळू शकणार आहे. या करारामध्ये कॅनडा, जपान आणि युरोपातल्या काही देशांचाही समावेश होण्याची शक्यता आहे. रशियाकडून पुन्हा आक्रमण झाल्यास युक्रेनला या देशांकडून संरक्षण सहकार्य मिळू शकेल, असा तर्क केला जाऊ लागला आहे. मात्र झेलेन्स्की यांनी अद्याप या संदर्भातली आपली भूमिका जाहीर केलेली नाही.