कोलकाता : जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या कोलकाता येथील साल्टलेक स्टेडियममधील कार्यक्रमादरम्यान झालेल्या मोठ्या गोंधळानंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. या कार्यक्रमाचा मुख्य आयोजक सताद्रु दत्ता याला पोलिसांनी विमानतळावरून (airport) अटक केली आहे. पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक (DGP) राजीव कुमार यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, ज्या प्रेक्षकांनी तिकिटे खरेदी केली होती, त्यांना त्यांचे पैसे परत (Refund) मिळालेच पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. नेमके काय घडले? डीजीपी राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्रमाचा मूळ आराखडा असा होता की, मेस्सी फक्त स्टेडियमवर येणार, हात हलवून प्रेक्षकांना अभिवादन करणार, काही निवडक लोकांना भेटणार आणि निघून जाणार. मात्र, कार्यक्रमाच्या नियोजनात मोठी गडबड (Mismanagement) झाल्याचा संशय आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या सर्व बाजूंनी चौकशी करण्यासाठी सरकारने आधीच एक समिती स्थापन केली आहे. आयोजकांकडून नेमकी काय चूक झाली किंवा काही गैरव्यवस्थापन झाले का, याची ही समिती तपासणी करेल. डीजीपींनी सांगितले की, सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि या गैरव्यवस्थापनासाठी जबाबदार असलेल्या एकाही व्यक्तीला सोडले जाणार नाही, याची पोलीस काळजी घेत आहेत. तिकिटांचे पैसे परत मिळणार या घटनेनंतर ज्या चाहत्यांना तिकिटांचे पैसे परत मिळण्याची चिंता आहे, अशा लोकांची यादी तयार करण्याचे काम आयोजक करत असल्याचे डीजीपींनी सांगितले. अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADG), कायदा आणि सुव्यवस्था, जावेद शमीम यांनीही ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “शांतता त्वरित प्रस्थापित करण्यात आली असून, वाहतूक सामान्य झाली आहे आणि सर्व लोक घरी परतले आहेत. ही घटना फक्त साल्टलेक स्टेडियमपुरती मर्यादित होती. एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला असून, मुख्य आयोजक सताद्रु दत्ता याला अटक करण्यात आली आहे.” एडीजी शमीम यांनी पुढे सांगितले की, आयोजकांनी चाहत्यांना तिकीट शुल्क परत करण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच दत्ताची कसून चौकशी केली जाईल आणि या गोंधळामागे तो एकटाच जबाबदार आहे की आणखी कुणाचे नाव यात सामील आहे, हे पाहिले जाईल. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मागितली माफी – या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील मेस्सीला भेटण्यासाठी स्टेडियमवर जाणार होत्या. मात्र, अफरातफरी आणि सुरक्षेची बिकट परिस्थिती पाहून त्यांनी स्टेडियमवर पोहोचण्याआधीच आपला कार्यक्रम रद्द केला आणि त्या वाटेतूनच परतल्या. या घटनेची गंभीर दखल घेत, ममता बॅनर्जी यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच, त्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या जनतेची आणि चाहत्यांची झालेल्या गैरसोयीबद्दल माफीही मागितली आहे. मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळाची कारणे: चाहत्यांचा संताप का उफाळला? अर्जेंटिनाचे फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सी १४ वर्षांनी भारतात आले आहेत. त्यांच्यासोबत उरुग्वेचा स्टार फुटबॉलपटू लुईस सुआरेझ आणि अर्जेंटिनाचा मिडफिल्डर रॉड्रिगो डी पॉल हे देखील आले आहेत. हे तिन्ही खेळाडू रात्री उशिरा २.३० वाजता कोलकाता विमानतळावर पोहोचले. त्यांनी आज सकाळी ११ वाजता कोलकाता येथे ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. यावेळी शाहरुख खान देखील उपस्थित होता. त्यानंतर हे तिघेही सॉल्ट लेक स्टेडियमवर पोहोचले, पण लवकर निघून गेले (सुमारे २२ मिनिटांत). संतप्त चाहत्यांनी स्टँडवरून बाटल्या आणि खुर्च्या फेकण्यास सुरुवात केली. साल्ट लेक स्टेडियममध्ये (युवा भारती क्रीडांगण) झालेला हा गोंधळ प्रामुख्याने अत्यंत खराब व्यवस्थापन (Poor Mismanagement) आणि चाहत्यांच्या अपेक्षाभंगामुळे झाला. मेस्सीचा अत्यंत कमी वेळ आणि लवकर निर्गमन चाहत्यांच्या माहितीनुसार, लिओनेल मेस्सी स्टेडियमवर फारच कमी वेळेसाठी, म्हणजे केवळ ५ ते १० मिनिटांसाठीच उपस्थित राहिला. मेस्सी ठरलेल्या वेळेपेक्षा खूप लवकर स्टेडियम सोडून गेला. यामुळे त्याला जवळून पाहण्याची किंवा त्याचे “मेस्सी मॅजिक” अनुभवण्याची संधी चाहत्यांना मिळाली नाही. मेस्सीने स्टेडियमची पूर्ण फेरी मारली नाही, ज्यामुळे स्टँड्समध्ये बसलेल्या अनेक चाहत्यांना त्याची साधी झलकही पाहता आली नाही. व्हीआयपी (VIP) आणि राजकीय व्यक्तींचा अडथळा चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, मेस्सी अवघ्या काही मिनिटांसाठी आला असतानाही, राजकीय नेते आणि मंत्री त्यांच्या मुलांसहित त्याला घेरून उभे राहिले. या व्हीआयपी (VVIP) गर्दीमुळे आणि सुरक्षेमुळे सामान्य चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूची एक स्पष्ट झलकही दिसली नाही. एका चाहत्याने सांगितले की, “सर्व नेते त्याला घेरून उभे राहिले, आम्हाला काहीही पाहता आले नाही.” यामुळे सामान्य चाहत्यांनी भरलेले तिकीट आणि व्हीआयपी लोकांना मिळालेली वागणूक यावरून मोठा भेदभाव झाल्याची भावना निर्माण झाली. महागडी तिकिटे आणि अपेक्षाभंग चाहत्यांनी मेस्सीला पाहण्यासाठी हजारो रुपये खर्च करून तिकिटे खरेदी केली होती (काही तिकिटे ₹१८,००० तर काही ₹४५,००० पर्यंत असल्याचे अहवाल आहेत). एवढे पैसे भरूनही केवळ ५ मिनिटांची झलक मिळाल्याने आणि तीही व्हीआयपी लोकांच्या गर्दीमुळे स्पष्ट न दिसल्याने चाहत्यांचा पारा चढला. अनेक संतापलेल्या चाहत्यांनी या कार्यक्रमाला “पूर्णपणे लाजिरवाणा” आणि “फसवणूक (Total Scam)” असे संबोधले. गोंधळ आणि तोडफोड – मेस्सी लवकर निघून गेल्याचे समजताच संतप्त चाहत्यांनी मैदानात गोंधळ घालायला सुरुवात केली. संताप व्यक्त करण्यासाठी काही चाहत्यांनी स्टेडियममधील खुर्च्या तोडल्या आणि त्या मैदानात फेकल्या. त्याचबरोबर पाण्याच्या बाटल्या, बेल्ट आणि होर्डिंग्जचीही तोडफोड करून आपला राग व्यक्त केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने आयोजकांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना मेस्सीला त्वरीत स्टेडियममधून बाहेर काढावे लागले. स्टेडियममध्ये दंगलविरोधी दल (RAF) तैनात करावे लागले होते.