छत्रपती संभाजीनगर : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबईसह महाराष्ट्रातील २९ पैकी २७ महानगरपालिकांमध्ये निवडणूक लढवणार असून, समविचारी पक्ष आणि महाविकास आघाडीसोबत (एमव्हीए) युतीसाठी तयार आहे, असे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मंगळवारी सांगितले. जलील यांनी सांगितले की, पक्ष किती जागा लढवणार हे अद्याप ठरलेले नसले तरी १५ जानेवारीच्या निवडणुकीसाठी २२ किंवा २३ डिसेंबरपर्यंत उमेदवारांची घोषणा केली जाईल. पक्ष ज्या भागांत मजबूत आहे, त्या भागांवर भर दिला जाईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही मागील कार्यकाळात सर्वात मोठा विरोधी पक्ष होतो. येथे भाजपपेक्षा अधिक जागा जिंकल्या होत्या. याशिवाय नांदेड, मुंबई, सोलापूरसह इतर महानगरपालिकांमध्येही आम्ही निवडणूक लढवू, असे त्यांनी स्पष्ट केले. एमव्हीएतील एका घटक पक्षाने युतीसाठी संपर्क साधल्याचा दावाही जलील यांनी केला, मात्र पक्षाचे नाव सांगितले नाही. राज्यव्यापी युतीसाठी आम्ही तयार असून, महाविकास आघाडीसोबतही युती करण्यास आम्हाला हरकत नाही, असे जलील म्हणाले.