शिरूर : अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथील उघड्या चेंबरमुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गेल्या सात दिवसांत येमाई मंदिर चौकाजवळ रामदेव बाबा स्टील दुकानाच्या समोरील याच उघड्या चेंबरमुळे दोन अपघात घडले आहेत. वारंवार ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शनिवारी (दि. १३) निलेश मिंडे हे दुचाकीवरून आपल्या संविदणे गावी निघाले असताना, रस्त्यावरील हा उघडा चेंबर त्यांना दिसला नाही. ते थेट दुचाकीसह चेंबरमध्ये पडले. या अपघातात त्यांना दुखापत झाली असून त्यांच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच टाकळी हाजी गावचे सरपंच दामूअण्णा घोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. कवठे येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब डांगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, “कवठे येथे अष्टविनायक महामार्गावर चार चेंबर उघड्या अवस्थेत असून त्यांची झाकणे तुटलेली आहेत. यामुळे वारंवार अपघात होत आहेत.” डांगे यांनी महामार्गाचे ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना तातडीने हे उघडे चेंबर दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. जर यावर त्वरित उपाययोजना न झाल्यास तीव्र जनआंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. महामार्ग प्रशासनाच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे रस्त्यावरील हे उघडे चेंबर प्रवाशांसाठी ‘मृत्यूचे सापळे’ ठरत आहेत. प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.