प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवाराचे नाव संबंधित महानगरपालिकेच्या मतदार यादीत असणे आवश्यक आहे. परंतु, सूचक आणि अनुमोदकाचे नाव मात्र उमेदवार निवडणूक लढवत असलेल्याच प्रभागात असणे आवश्यक आहे. पक्षाच्या उमेदवारास आणि अपक्ष उमेदवारासही प्रत्येकी एक सूचक आणि एका अनुमोदकाची आवश्यकता असते. एखादा उमेदवार एकापेक्षा जास्त प्रभागात नामनिर्देशनपत्र भरू शकतात; परंतु एका उमेदवारास एका प्रभागातील एकाच जागेसाठी निवडणूक लढविता येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली. यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आदींसह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी सांगितले की, महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. संबंधित अधिनियमातील तरतुदींनुसार मतदान समाप्तीच्या 48 तास आधी म्हणजे 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपेल.