भाजप १४०, तर शिवसेना ८७ जागांवर लढणार, मुंबईत महायुतीचा फॉर्म्युला निश्चित आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अखेर निश्चित झाले असल्याची माहिती समोर आली असून, एकूण २२७ जागांपैकी भाजप १४० तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ८७ जागा लढवणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्याने आता भाजप आणि शिवसेना मिळून सर्व जागा लढवतील. सुरुवातीला भाजपने शिवसेनेला केवळ ५२ जागांचा प्रस्ताव दिला होता, मात्र बदलत्या राजकीय समीकरणांमुळे शिवसेनेच्या वाट्याला आता ८७ जागा आल्यात. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतलीय. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होतील. आशियातील सर्वात श्रीमंत पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी आता खऱ्या अर्थाने राजकीय रणधुमाळी सुरू झालीय. पुण्यात मोठी राजकीय उलथापालथ, प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी अखेर काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांकडून ऑफर असतानाही, जगताप यांनी काँग्रेसचा हात धरलाय. पुणे महापालिकेत शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटांची आघाडी करण्याच्या निर्णयाला जगताप यांचा तीव्र विरोध होता. ही आघाडी तत्त्वांना धरून नसल्याचे सांगत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. जगताप यांच्या या निर्णयामुळे पुण्यात महाविकास आघाडीतील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या, राजकीय वैमनस्याचा संशय रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे शुक्रवारी सकाळी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली. मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना, काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी काळोखे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून राजकीय वातावरण तापलेय. शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केला असून, निवडणुकीतील पराभवाच्या रागातून ही हत्या घडवून आणल्याचा दावा त्यांनी केलाय. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून सीसीटीव्हीच्या आधारे फरार आरोपींचा शोध सुरू आहे. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याची माहितीही समोर आली आलीय. लग्नानंतर पत्ता बदललाय का? अपडेट करा मतदार ओळखपत्र आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदारांना आपला पत्ता अद्ययावत करण्याचे आवाहन केलेय. विशेषतः लग्नानंतर पत्ता बदललेल्या महिलांसाठी ही प्रक्रिया आता अधिक सोपी झाली असून, राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल NVSP द्वारे घरबसल्या बदल करता येईल. त्यासाठी NVSP पोर्टलवर जाऊन ‘Form 8’ निवडा. येथे ‘Self’वर क्लिक करून EPIC क्रमांक टाका. ‘Shifting of Residence’ पर्यायावर क्लिक करा. नवीन पत्ता, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर भरा. पत्त्याचा पुरावा (आधार, वीज बिल किंवा बँक पासबुक) अपलोड करा. फॉर्म सबमिट केल्यावर मिळणारा रेफरन्स नंबर सेव करा. अर्ज मंजूर होताच डिजिटल ओळखपत्र डाउनलोड करता येईल. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत योग्य पत्ता असणे अनिवार्य आहे. नवीन वर्षात कामगारांना मोठी भेट; पगार, सुट्ट्या आणि पेन्शनमध्ये होणार बदल केंद्र सरकार देशात चार नवीन लेबर कोडची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या तयारीत असून, यामुळे खासगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीचे नियम पूर्णपणे बदलणार आहेत. त्यानुसार मूळ पगार एकूण पगाराच्या ५०% असणे अनिवार्य असेल, ज्यामुळे ‘इन-हँड’ पगार घटणार पण पीएफ वाढेल. नोकरी सोडल्यास २ दिवसांत पूर्ण पगार देणे कंपनीला बंधनकारक असेल. आता ५ वर्षांऐवजी केवळ १ वर्षाच्या सेवेनंतरही ग्रेच्युटी मिळणार. आठवड्याला ४८ तास काम करावे लागणार असून ४ दिवसांचा आठवडा करायचा असल्यास कामासाठी रोज १२ तास ड्युटी आवश्यक असेल. ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त कामासाठी अर्थात ओव्हरटाईमसाठी दुप्पट दराने मोबदला मिळेल. प्रत्येक कर्मचाऱ्याला सॅलरी स्लिप आणि नियुक्ती पत्र देणे अनिवार्य असेल. २० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या सर्व संस्थांमधील कर्मचाऱ्यांना पीएफ नियम लागू होईल. डिलिव्हरी बॉय आणि फ्रीलान्सर्सना प्रथमच सामाजिक सुरक्षा विम्याचा लाभ मिळेल. तसेच समान वेतन लागू होणार आहे. राजकीय देणग्यांत भाजपाची बाजी, काँग्रेसला वैयक्तिक देणगीदारांचा आधार निवडणूक आयोगाच्या २०२४-२५ च्या अहवालानुसार, निवडणूक रोखे योजना रद्द झाल्यानंतरही राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणात निधी मिळालाय. लोकसभा निवडणुकीच्या वर्षात भाजपाला एकूण ६,०८८ कोटी रुपये मिळाले, जे काँग्रेसच्या ५१६ कोटींच्या तुलनेत १२ पटीने अधिक आहेत. भाजपाला २,०४५ व्यक्तींकडून ३४५ कोटींचा निधी मिळाला असला, तरी त्यांच्या एकूण निधीत वैयक्तिक देणग्यांचा वाटा केवळ ५.६% आहे. याउलट, काँग्रेसला २,३८६ व्यक्तींकडून १३९ कोटी रुपये मिळाले असून, त्यांच्या एकूण निधीत वैयक्तिक देणग्यांचा वाटा २६% इतका मोठा आहे. भाजपाला सर्वाधिक निधी कॉर्पोरेट संस्था आणि इलेक्टोरल ट्रस्टकडून ८२% मिळालाय. वैयक्तिक देणगीदारांमध्ये सुरेश कोटक यांनी दोन्ही पक्षांना मोठी रक्कम दिलीये. भारतीय शेअर बाजारात ‘पैसा झाला मोठा’, २०२५ मध्ये IPO द्वारे २ लाख कोटींची कमाई भारतीय शेअर बाजारासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरलेय. या वर्षात आयपीओ मार्केटने सर्व जुने विक्रम मोडीत काढत तब्बल २ लाख कोटी रुपये उभे केलेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या अहवालानुसार, २०२५ मध्ये ३६५ हून अधिक आयपीओ आले, ज्याद्वारे १.९५ लाख कोटी रुपये जमा करण्यात आले. या विक्रमी कामगिरीत ‘मेनबोर्ड’ आयपीओचा सिंहाचा वाटा असून, एकट्या टाटा कॅपिटलच्या १५,५०० कोटींच्या आयपीओने मोठी खळबळ उडवून दिली. विशेषतः NBFC क्षेत्राचे या निधी उभारणीत २६.६% योगदान राहिले. गेल्या दोन वर्षांत (२०२४-२५) जमवलेला निधी हा मागील पाच वर्षांच्या एकूण निधीपेक्षाही जास्त आहे. गुंतवणूकदारांचा प्रचंड ओघ आणि रिन्यूएबल एनर्जीसारख्या नव्या क्षेत्रांमुळे भारतीय बाजारपेठ आता जागतिक स्तरावर एक मजबूत इक्विटी हब म्हणून उदयास आलीये. महिला प्रवाशांसाठी खुशखबर, कॅब बुकिंगमध्ये मिळणार ‘महिला ड्रायव्हर’ कॅबमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचललेय. आता ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या ॲप-आधारित कॅब सेवांमध्ये महिला प्रवाशांना ‘महिला ड्रायव्हर’ निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेत. विशेषतः रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. ज्या भागात महिला चालक उपलब्ध असतील, तिथे हा पर्याय ग्राहकांना दिसेल. यासोबतच सरकारने टिप देण्याच्या नियमातही बदल केलाय. आता प्रवाशांना केवळ प्रवास पूर्ण झाल्यावरच टिप देता येईल आणि ही संपूर्ण रक्कम चालकाला मिळेल, त्यावर कंपनीचा कोणताही अधिकार नसेल. यामुळे प्रवासी सुरक्षा आणि चालक पारदर्शकता या दोन्ही गोष्टी साध्य होतील. ‘शोले’ ते ‘देवदास’ पुन्हा रुपेरी पडद्यावर, २०२५ मध्ये अवतरली बॉलिवूडची सुवर्णगाथा चित्रपटसृष्टीत सध्या ‘नॉस्टॅल्जिया’ची लाट असून २०२५ या वर्षात अनेक आयकॉनिक हिंदी चित्रपटांनी सिनेमागृहात दिमाखात पुनरागमन केले. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांना नव्या पिढीचाही उदंड प्रतिसाद लाभला. या ट्रेंडची सुरुवात जानेवारीत ‘कहो ना… प्यार है’ आणि ‘ये जवानी है दीवानी’ ने झाली. व्हॅलेंटाईन वीकचे औचित्य साधून शाहरुख खानचा ‘देवदास’, ‘दिल तो पागल है’ आणि तरुणाईचा लाडका ‘जब वी मेट’ पुन्हा प्रदर्शित झाले. विशेष म्हणजे, अमिताभ बच्चन यांचा ‘शोले’ आणि रेखा यांचा ‘उमराव जान’ हे चित्रपट अत्याधुनिक 4K रिस्टोर्ड आवृत्तीत झळकले, ज्यामुळे प्रेक्षकांना भव्य सिनेमॅटिक अनुभव मिळाला. ‘रॉकस्टार’, ‘सनम तेरी कसम’ आणि ‘पद्मावत’ यांसारख्या चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचून हे सिद्ध केले की, काळ बदलला तरी अस्सल सिनेमाची जादू कायम राहते. विजय हजारे स्पर्धेत रोहित शर्माचा ‘डुप्लिकेट’ चर्चेत, चेहरा आणि शरीरयष्टी हुबेहूब रोहितसारखीच विजय हजारे ट्रॉफीमध्ये सध्या टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्माच्या एका फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ज्यामध्ये रोहितचा डुप्लिकेट दिसतोय. सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात रोहित स्लिपमध्ये उभा असताना त्याच्या मागे असलेल्या हार्दिकचा चेहरा आणि शरीरयष्टी हुबेहूब रोहितसारखीच दिसत होती, ज्यामुळे चाहते अवाक् झाले. या सामन्यात रोहित ‘गोल्डन डक’वर बाद झाला असला, तरी हार्दिकने ८२ चेंडूत ९३ धावांची झंझावाती खेळी केली. २७ वर्षीय हार्दिक तामोरे हा मुंबईचा भरवशाचा खेळाडू असून त्याने याआधी रणजी ट्रॉफीमध्येही शतकी खेळी करत आपली क्षमता सिद्ध केलीय. सध्या त्याच्या या कामगिरीसोबतच रोहितसोबतच्या विलक्षण सारखेपणामुळे तो प्रसिद्धीझोतात आलाय.