न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २०१६ मध्ये आपल्या निवडणूक प्रचारावेळी अडल्ट फिल्ममध्ये काम करणाऱ्या पॉर्न स्टारला गुपचूप पैसे दिल्याच्या प्रकरणात न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन न्यायालयात हजर होताच अटक करण्यात आली आहे. न्यूयॉर्क ग्रँड ज्युरीने ट्रम्प यांच्यावर अॅडल्ट स्टार प्रकरणात फौजदारी खटला चालवण्यास मान्यता दिली. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना अटक होणार हे निश्चित होतं. काही वेळापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली आहे.
एखाद्या प्रकरणात अटक झालेले डोनाल्ड ट्रम्प हे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. गुन्ह्यांच्या आरोपांना सामोरे जावे लागलेले ते पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फसवणुकीच्या ३० पेक्षा जास्त गुन्ह्यांचा आरोप आहे. यातला सर्वात गंभीर आरोप आहे तो पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला तिचं तोंड गप्प ठेवण्यासाठी पैसे दिल्याचा.
२०१६ च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारात आर्थिक गैरव्यवर केल्याचा ठपका डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण स्टॉर्मी डॅनियल्सशी संबंधित आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स यांचं अफेअर असल्याचाही आरोप आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी १ लाख ३० हजार डॉलर्स दिल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी संमती देण्यात आली होती तेव्हापासूनच त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. आता याच प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली आहे.