प्रभात वृत्तसेवा पुणे – दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्र येण्याचे गणित जमेचिना अशी स्थिती असताना आता दोन्ही पक्षांमधील चर्चा निष्फळ ठरल्याचे दिसते. यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून(मविआ) निवडणूक लढवणार असल्याचे पक्के झाले आहे.राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाचे (राशप)प्रवक्ते अंकुश काकडे, विशाल तांबे, प्रकाश म्हस्के आणि आमदार बापू पठारे यांनी बारामती हाॅस्टेलवर राष्ट्र्वादी काॅंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची शुक्रवारी भेट घेऊन एकत्र लढण्यावर चर्चा केली. यातून काही निष्पन्न झाले नसल्याने राशपने मविआसमवेत जाण्याचा निर्णय घेतला.जागावाटपाबरोबर निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्याने चर्चा फिस्कटली. भाजपने आरपीआयबाबत जे धोरण तेच अजित पवारांनी राशपबाबत अवलंबले. त्यांनी ३५ जागांवर एकमत करू शकतो, पण उमेदवार तुतारी नव्हे तर घड्याळाच्या चिन्हावरच लढतील अशीही घातली. याला राशपने नकार दिला. यामुळे पक्षाचे शहरातील अस्तित्वच संपले असते. यानंतर पक्षाने तातडीने मविआची एका हाॅटेलमध्ये बैठक बोलावली. बैठकीला राशपचे सर्व पदाधिकारी, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अभय छाजेड, रमेश बागवे, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे गजानन थरकुडे, संजय मोरे, वसंत मोरे उपस्थित होते.