“महाविकास आघाडी फुटल्यास….”; ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या?

Supriya Sule : येत्या काही दिवसांत राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून, या पार्श्वभूमीर हालचालींना मोठा वेग आला आहे. सगळ्यांचे लक्ष सर्वांत श्रीमंत असेलल्या मुंबई महापालिकीच्या निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीत भाजप-शिवसेना (शिंदे) यांच्यात बैठकांचे सत्र सुरू असून लवकरच अंतिम निर्णय होणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी फुटणार असल्याचे दिसत असून, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी विखुरली तर.. याबाबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची काय भूमिका असणार याविषयी पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
भाजपविरोधी एकच मजबूत आघाडी व्हावी यासाठी पक्षनेतृत्वाकडून काँग्रेसशी चर्चा करण्यात येत असून ते न झाल्यास दुसऱ्या पर्यायांचा विचार करण्यात येईल, असे सूचक वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. खरंतर मुंबई महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मर्यादित आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ही निवडणूक अटीतटीची असणार आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी पक्षाची मुंबई महापालिका निवडणुकीत युती होणार असल्याच्या चर्चा देखील होत आहेत. तशी विचारणा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केली जात आहे. पण युतीबाबत अद्यापर्यंत कोणतीही मोठी माहिती समोर आलेली नाही.
निकालावरही दिली प्रतिक्रिया
याबाबतही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र निवडणूक लढणार असल्याचे विधाने केली जात आहेत. याविषयी बोलताना याबाबत मला काहीही माहिती नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. नगरपरिषद आणि नगरपंचयातींच्या निकालावर बोलताना सुळे यांनी साधारणपणे ज्यांची सत्ता असते त्यांचाच अशा निवडणुकांमध्ये विजय होतो हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे या निकालांबाबत काहीही नवल वाटले नाही, असे म्हणाल्या आहेत.
हेही वाचा : Bhagyashree Instagram Post: बनारसच्या स्ट्रीट फूडवर भाळली भाग्यश्री; पतीसोबत मलइयो आणि चाटचा घेतला आस्वाद





