पिंपरी | एकविरादेवी मंदिरासह मावळात गावोगावी घटस्थापना

मावळ (वार्ताहर) – मावळात गुरुवारी धार्मिक व पारंपरिक पद्धतीने शारदीय नवरात्रौ उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. मावळात कार्ला- वेहरगाव येथील एकवीरादेवी व खंडाळ्यातील वाघजाई देवी मंदिरासह लोणावळा आणि परिसरातील प्रत्येक गावातील देवींची मंदीरे,
ग्रामदैवत तसेच कुलदेवतांच्या मंदिरात संबळ आणि ढोल ताशांच्या निनादात तसेच देवीच्या नावांचा गजर करत धार्मिक, पारंपारिक व भक्तीमय वातावरणात घटस्थापना करण्यात आली.
पहिल्याच दिवशी वेहरगाव- कार्ला येथे एकविरा देवीच्या व खंडाळ्यातील वाघजाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
एकविरा देवी मंदिरात घटस्थापना –
महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या वेहरगाव कार्ला गडावरील आई एकवीरा देवीच्या मंदिरात गुरुवारी पहाटे पहाटे देवीचा अभिषेक व आरती करत सकाळी आमदार सुनील शेळके व सारिका सुनिल शेळके तसेच एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुळावले व दिपाली दीपक हुळावले यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना करण्यात आली.
वाघजाई देवी मंदिरात घटस्थापना –
खंडाळा गावाचे ग्रामदैवत असलेल्या व खंडाळा घाटाची रक्षणकर्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाघजाई देवीची देवस्थान ट्रस्ट व खंडाळा ग्रामस्तांकडून ढोल ताश्यांच्या गजरात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीनंतर दुपारी साडेबारा वाजता लोणावळ्यातील उद्योजक उन्मेष जोशी व माधवी जोशी या दाम्पत्यांच्या हस्ते वाघजई देवी मंदिरात घट बसविण्यात आले.
घटस्थापनेनंतर सालाबादप्रमाणे ट्रस्टकडून गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक, क्रिडा क्षेत्रात प्राविण्या मिळविलेले क्रिडापटू व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यात आला.
तळेगाव शहर परिसरात मंदिरे आणि घरांत घटस्थापना –
नवरात्र उत्सवानिमित्त तळेगाव शहर परिसरातील देवी मंदिरामध्ये व घरोघरी अतिशय उत्साहाने घटस्थापना आणि देवी प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्या.
या उपक्रमात महिला वर्गांचा सक्रिय सहभाग होता. तळेगाव शहरातील कालिका देवी मंदिरामध्ये घटस्थापना व देवी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
याशिवाय गाव विभागातील शितळादेवी मंदिर, मरी माता मंदिर, दुर्गा माता मंदिर, जिजामाता मंदिर, काळोखे वाडीतील अंबिका मंदिर, वरसुबाई मंदिर आदी ठिकाणी विधीवत घटस्थापना आणि देवी प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्या. तर घरोघरी ही घटस्थापना अतिशय उत्साहाने करण्यात आली.
लोणावळा शहर परिसरात घटस्थापना –
लोणावळ्यातील नांगरगाव येथील नांगराई देवी, तुंगार्लीतील जाखमाता देवी, सोमजाई देवी, शितळाई देवी या दैवतांच्या मंदिरात पहाटे व सकाळी देवी देवतांना दुग्ध स्नान, महाअभिषेक करून ठिक ठिकाणच्या परंपरेनुसार विधिवत धार्मिक रितीरिवाजानुसार घटस्थापना करण्यात आली.
पुढील नऊ दिवस शहरातील मुख्य देवस्थान व देवी देवतांच्या मंदिरासह गावोगावी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी शारदीय नवरात्रौत्सव होणार आहे.
यामध्ये दैनंदिन आरती, महाप्रसाद, पारायण, भजन व प्रवचन, देवी देवतांची गाणी आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.





