पिंपरी – स्थायी समितीवरील एसीबीच्या कारवाईनंतर स्थायी समितीचे 16 सदस्य चर्चेत आले आहेत. परंतु, त्यापैकी नगरसेवक रवी लांडगे यांनी सहा महिन्यांपूर्वीच राजीनामा दिला होता. 16 सदस्यांची सातत्याने चर्चा होऊ लागल्याने अखेर सत्ताधारी भाजपला जाग आली असून पक्षाने त्यांचा राजीनामा मंजूर करून नवीन सदस्य नियुक्तीचा निर्णय घेतला आहे.
तब्बल सहा महिन्यांनी महापौर माई ढोरे यांनी हा राजीनामा मंजूर केला. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर 20 सप्टेंबरच्या महासभेत नवीन एका सदस्याची नियुक्ती केली जाणार आहे. मागील निवडणुकीत रवी लांडगे भोसरीतून बिनविरोध निवडून आले होते. परंतु, स्थायी अध्यक्षपदासाठी दावेदार असताना त्यांना डावलण्यात आले. अध्यक्षपदासाठी डावलले गेल्यानंतर रवी लांडगे यांनी तात्काळ सदस्यपदाचा राजीनामा महापौरांकडे दिला होता.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या एसीबीच्या कारवाईमुळे स्थायी समिती चर्चेत आली आहे. एसीबीकडून वारंवार “त्या’ 16 जणांचा उल्लेख होत आहे. “ते’ 16 जण म्हणजे स्थायीचे सदस्य असल्याचेही एसीबीने न्यायालयासमोर म्हटले होते. मात्र, स्थायीमध्ये 15 सदस्यच कार्यरत होते. रवी लांडगे यांनी एकाही सभेला हजेरी लावलेली नसल्याचेही समोर आले.
एसीबीकडून होणारा उल्लेख आणि 16 सदस्यांची चौकशी झाल्यास ही बाब सत्ताधारी भाजपाला आणखीनच अडचणीत आणणारी ठरू शकते, याची जाणिव झाल्यानंतर लांडगे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.