पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या ठेकेदारांच्या कामांची आणि मनुष्यबळाची तपासणी मोहीम महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशाने राबविण्यात येत आहे. या तपासणी मोहिमेमुळे अनेक ठेकेदारांचे धाबे दणाणले असून प्रत्यक्ष जागेवरील पाहणीच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याने या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध विभागांमध्ये मनुष्यबळ पुरविण्याचे काम ठेकेदारी पद्धतीने देण्यात येते. यामध्ये सुरक्षा रक्षक पुरविणे, रस्ते साफसफाई करणे, उद्यानांमध्ये कर्मचारी पुरविणे, शाळांची सुरक्षा व स्वच्छता, रुग्णालयांतील मेडिकल, पॅरामेडिकल कर्मचारी पुरविणे, रुग्णालयांची स्वच्छता करणे, विद्युत दाहिनीसाठी कर्मचारी पुरविणे, स्मशानभूमी, पाणीपुरवठा, वैद्यकीय व आरोग्यसह अनेक विभागातील कामे ठेकेदारी पद्धतीने देण्यात आली आहेत. या कामांचा ठेका देताना ठराविक कर्मचारी पुरविण्याची अट करारनाम्यामध्ये निश्चित करण्यात आलेली असते.
या सर्व कामांमध्ये अनेक ठेकेदारांकडून अटी शर्तीचे पालन केले जात नसल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांना हातशी धरून निविदा अटीतील संख्येपेक्षा कमी मनुष्यबळ पुरविणे, अर्धवेळ कामगार लावून पुर्णवेळ भासविणे, स्वच्छता न करणे, सुरक्षा न पुरविणे असे प्रकार करत असल्याची बाब समोर आली होती. कामांवरील महिलांच्या छेडछाडीचे प्रकारही निदर्शनास आल्यामुळे आयुक्तांनी नुकतेच एका संस्थेवर कारवाईकरत फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या एका संस्थेची तपासणी अंतिम टप्प्यात आहे. दुसऱ्या संस्थेनेही चुकीचीच कामे केल्याचे समोर आल्यानंतर आयुक्तांनी सरसकट ठेकेदारांची तपासणी मोहिम हाती घेतली आहे.
पालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त कामांचा आणि आर्थिक ताण येऊ नये दिलेली कामे योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावीत, यासाठी आयुक्तांनी ऍक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक पथक नेमण्यात आले आहे. हे पथक ठेकेदारांच्या कामांची तपासणी करणार आहे. पथकाच्या वतीने ठेकेदारांनी सुरू केलेल्या कामाच्या तारखेपासून त्यांच्या कामाची पाहणी केली जाईल. त्यामध्ये ठेकेदारांने केलेल्या कामाचा दर्जा, त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता, केलेल्या कामावरून त्याची क्षमता तपासली जाईल.
कर्मचाऱ्यांची फसवणूक रोखणार
मनुष्यबळाच्या कामांमध्ये पुरविण्यात येणाऱ्यांची पात्रता, त्यांच्याकडून करण्यात येणारे काम तपासण्यात येणार आहे. तसेच ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांना वेळेत व किमान वेतन दिले जाते का याची चौकशीदेखील या पथकाकडून केली जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांची फसवणूक होणार नाही. तसेच कर्मचाऱ्यांनी करावयाच्या कामाची गुणवत्ता उत्तम राहील, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
स्वच्छ व गुणवत्तापूर्ण कारभारावर भर
आयुक्त राजेश पाटील यांची फेब्रुवारी महिन्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामांमुळे प्रशासनावर मोठी ठीका होत होती. तसेच बनावट दाखले व बॅंक गॅरंटी देऊन पदरात कामे पाडून घेणाऱ्या ठेकेदारांची अनेक नावे त्यापूर्वीच समोर आली होती. कोणत्याही परिस्थितीत ठेकेदारांकडून महापालिकेच्या कररुपी पैशांचा अपव्यय होऊ नये, यासाठी आयुक्तांनी ऍक्शन प्लॅन हाती घेतला आहे. त्यामुळे यापुढे ठेकेदारांच्या सर्वच कामांची आयुक्तांच्या पथकाकडून पाहणी केली जाणार आहे. त्यामध्ये दोषी आढळणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्वच ठेकेदारांची पाचावर धारण बसली आहे.
ठेकेदारांची पंचाईत
मनुष्यबळ पुरविणाऱ्या अनेक संस्था या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांशी व विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी निगडतीत आहेत. या नेतेमंडळींच्या अनेक कार्यकर्त्यांना आर्थिक ताकद देण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या कामांवर हे कार्यकर्ते काम करत असल्याचे भासवून त्यांना पगारी दिल्या जात आहेत. कंत्राटी पद्धतीने कामावर असलेले हे कार्यकर्ते नेतेमंडळींच्या अवतीभवती फिरण्यातच दिवस घालवित असल्यामुळे अनेक ठिकाणी गैरकारभार समोर येण्याची शक्यता आहे.