R Ashwin’s 100th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना धर्मशाला येथे खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ टीम इंडियाच्या नावावर राहिला. नाणेफेक हारल्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडचा पहिला डाव 218 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 गडी गमावून 135 धावा केल्या होत्या.
याआधी 100 वा कसोटी सामना खेळत असलेल्या आर अश्विनने अप्रतिम गोलंदाजी केली. आर अश्विन भारताकडून 100 कसोटी सामने खेळणारा 14वा खेळाडू ठरला आहे. या विशेष सामन्याच्या पहिल्या डावात त्याने चांगली कामगिरी केली. आर अश्विनने इंग्लंडच्या पहिल्या डावात 11.4 षटके टाकली आणि 51 धावा देत 4 फलंदाजांना आपले बळी बनवले. यादरम्यान आर अश्विनने बेन फॉक्स, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
‘या’ विशेष यादीत कपिल देव यांना टाकलं मागे…
आर अश्विनने या सामन्याच्या पहिल्या डावात एक खास विक्रमही आपल्या नावावर केला. 100व्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सर्वोत्तम गोलंदाजी करणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. अश्विन याने इंग्लंडविरूध्द पाचव्या कसोटीतील पहिल्या डावात 51 धावा देत 4 बळी घेतले आहेत. यापूर्वी कपिल देव या यादीत आघाडीवर होते. कपिल देव ( Kapil Dev ) यांनी आपल्या 100व्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 69 धावांत 4 बळी घेतले होते.
कुलदीप यादवचा पंजा….
या सामन्यातील पहिल्या डावात कुलदीप यादव सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. कुलदीप यादवने 15 षटकांत 72 धावा देत 5 बळी घेतले. कुलदीप यादवने जॅक क्राउली, बेन डकेट, ऑली पोप, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स या स्टार फलंदाजांना आपले बळी बनवले. कसोटी सामन्याच्या एका डावात 5 बळी घेण्याची त्याची कारकिर्दीतील ही चौथी वेळ आहे.