पुणे – “घटसर्प’ रोगाच्या संशयित असणाऱ्या सात वर्षांच्या मुलाचा मंगळवारी रात्री ससून रुग्णालयात मृत्यू झाला. या रोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण सध्याच्या काळात अतिशय दुर्मीळ आहे. त्याला “घटसर्प’ झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, त्या मुलाच्या स्वॅबचे सॅम्पल्स इंदूरला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
त्याला ससूनमध्ये अत्यवस्थ झाल्यावर दाखल करण्यात आले. त्याला घटसर्प झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटसर्पावर प्रतिबंधक असलेली “डीपीटी’ (घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात यांचे एकत्रित) लस बाळाला जन्मानंतर चार ते सहा महिन्यांत देतात. त्यामुळे या रोगाने मृत्यू होण्याची शक्यता कमी आहे.
अशा स्थितीत या मुलाला या लसीचे डोस दिले होते का, याची तपासणी पालिकेकडून केली जात आहे. प्राथमिक तपासात त्याला घटसर्प झाल्याचे निदान झाले. या मुलाबाबतची सर्व माहिती ससूनमार्फत “डब्ल्यूएचओ’ला गेली आहे. इंदूर प्रयोगशाळेतून त्याच्या स्वॅबचा अंतिम अहवाल काही दिवसांत येईल.
घटसर्पाची लस चार ते सहा महिन्यांच्या बाळाला नियोजित लसीकरणातून दिली जाते, त्यामुळे बालकांचे या रोगांपासून संरक्षण होते. 14 वर्षांपर्यंतची बालके या रोगाचा संसर्ग होण्याला संवेदनशील असतात. गेल्या अनेक वर्षांपासून “डीपीटी’ची लस दिली जात आहे. त्यामुळे हा रोग होऊन दगावण्याच्या घटना ऐकिवात नाहीत. या मुलाचा मृत्यू नेमका कसा झाला? त्याला लस दिली होती का, याची माहिती
मागवली आहे.
– डॉ. अर्चना पाटील, राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख संचालक