नवी दिल्ली – यावेळची लोकसभा निवडणूक लढवणारे १२१ उमेदवार निरक्षर आहेत. तर, ३५९ उमेदवारांनी इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्याउलट, १९८ उमेदवारांनी डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे.
यावेळच्या निवडणुकीत एकूण ८ हजार ३६० उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यापैकी ८ हजार ३३७ उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेची छाननी करून असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने तपशील जारी केला. त्यानुसार, ६४७ उमेदवारांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे.
इयत्ता बारावी उत्तीर्ण करणारे १ हजार ३०३ उमेदवार आहेत. तर, १ हजार ५०२ उमेदवार पदवीधारक आहेत. एडीआरने उमेदवारांच्या वयाचाही तपशील दिला. त्यानुसार, ११ उमेदवारांचे वय ८० वर्षांपेक्षा अधिक आहे.
तर, २५ ते ३० वर्षे वयोगटातील ५३७ उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवार त्यासमवेत प्रतिज्ञापत्रही जोडतात. त्या प्रतिज्ञापत्रांची छाननी करून एडीआर ही संस्था उमेदवारांशी संबंधित विविध तपशील उघड करते.