पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघामधील फरासखाना पोलीस स्टेशन, मंडई पोलीस चौकी, सेनादत्त पोलीस चौकी या परिसरातील अंतर्गत भागातील महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याच्या 96 लाख 71 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिल्याचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.
रासने म्हणाले की, या प्रकल्पासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाच्या आवश्यक त्या मान्यता घेण्यात आल्या आहेत. 5 मेगा पिक्सल बुलेटचे 147 कॅमेरे, 4/5 मेगा पिक्सल बुलेटचे 30 कॅमेरे, 32 चॅनेल नेटवर्कचे 7 व्हीडिओ रेकॉर्डर, 4 टी. बी. हार्ड डिस्क, 48 ते 50 इंचाचे एलईडी टीव्ही, गिगाबिट सिंगल मोड मीडिया, कन्हवर्टर, वायर्स, केबल इत्यादी आवश्यक उपकरणांचा या यंत्रणेत समावेश आहे.
हे कॅमेरे महात्मा फुले मंडई, अप्पा बळवंत चौक, तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, सदाशिव पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, नारायण पेठ, शास्त्री रस्ता, नवी पेठ या शहराच्या मध्यवर्ती भागांत पुणेकरांची मुख्य बाजारपेठ आहे.
या शिवाय महत्त्वाच्या शासकीय आस्थापना, बॅंका आणि व्यापारी कार्यालये याच भागांत आहेत. या परिसरात दाट लोकवस्ती असून, वाहतुकीची वर्दळ असते. नवीन सीसीटीव्ही यंत्रणेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.