पुणे -जिल्हा परिषद क्षेत्रातील 23 गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला. त्यापूर्वी येथील बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये बोगस कर्मचारी भरती झाल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. त्याबाबत तक्रारीही करण्यात आल्या असून, जिल्हा परिषदेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत, तात्काळ चौकशी स्थापन करून आज तक्रारी अर्ज स्वीकरण्यात आले. त्यामध्ये दिवसभरात 17 जणांनी बोगस भरती आणि नियुक्तीप्रकरणी तक्रार अर्ज दाखल केले आहे.
जून 2021च्या अखेरीस पुणे जिल्हा परिषदेतील 23 गावे पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आली. त्यानुसार ग्रामपंचायतीने सर्व दफ्तर आणि आर्थिक व्यवहार संबधित क्षेत्रीय कार्यालयात जमा केले. त्याचवेळी समाविष्ट गावातील ग्रामपंचायतींमध्ये बोगस कर्मचारी भरती केल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज देण्यात आले.
त्याबाबत सीईओ यांनी तत्काळ या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची ही समिती स्थापन करण्यात आली.
यामध्ये वित्त विभागाचे रणजित कदम, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, सामान्य प्रशासन विभाग कक्ष अधिकारी धनंजय खटावकर आणि विस्तार अधिकारी नीलेश जाधव हे समितीचे सदस्य आहेत. दरम्यान, या समितीकडून बुधवारी (दि. 14) या प्रकरणी ज्यांना तक्रार द्यायचे त्यांच्यासाठी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली.
त्यानुसार हवेली तालुक्यातील न्यू कोपरे, कोंढवे-धावडे, मांजरी बुद्रुक, जांभूळवाडी, कोळेवाडी या परिसरातून एकूण 17 जणांचे तक्रारी अर्ज आले आहे. या अर्जावर आता समितीकडून पडताळणी होणार आहे. तसेच संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांनाही बोलविण्यात येणार असून, त्यापूर्वी घडलेल्या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याबाबत हवेली आणि मुळशी तालुक्याचे गटविकास अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत.