पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कल्याणीनगर अपघातप्रकरणी गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी आरोपी चालवत असलेल्या पोर्शे कारमधील चालकाचा जबाब नोंदवला आहे. या जबाबात चालकाने नमूद केले की, आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी त्याला सूचना केली होती की, मुलाने जर गाडी चालवायला मागितली, तर त्याला गाडी दे आणि तू बाजूला बस. या सूचनेनुसार त्याने मुलाला गाडी चालवायला दिली होती. अल्पवयीन मुलगा ज्या हॉटेल व क्लबमध्ये पार्टीसाठी जाणार आहे, तेथे दारू मिळते, याची माहिती अग्रवाल यांना होती. तरीदेखील त्यांनी त्याला पार्टीला जाऊ दिले.
पार्टीसाठी जाताना त्याला पॉकेटमनी दिला होता का? पार्टीसाठी अल्पवयीन मुलाला नेमके किती पैसे दिले होते किंवा स्वतःचे क्रेडीट कार्ड वगैरे दिले होते काय? अल्पवयीन मुलासोबत पार्टीसाठी कोणकोण होते? याबाबत आरोपीकडे सखोल तपास करून पुरावे हस्तगत करायचे आहेत.
त्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील विद्या विभूते आणि योगेश कदम यांनी केली. गावकर आणि शेवानी यांनी आरोपी अल्पवयीन आहे की नाही, याची तपासणी न करता त्यांना मद्यपान करण्याची परवानगी दिली, असे ऍड. विभूते यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
गाडीच्या तांत्रिक बिघाडाबाबत दावे – प्रतिदावे
अपघातातील गाडी बंगळूर येथून खरेदी केली आहे. या मोटारीत तांत्रिक बिघाड असल्याचे अग्रवाल यांच्या निदर्शनास आले होते. गाडीतील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून देण्याबाबत त्यांनी कंपनीशी वेळोवेळी संपर्क साधला होता. मात्र, कंपनीने त्याची दखल न घेतल्याने अगरवाल यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली होती.
तेथे दाखल असलेली तक्रार अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे गाडीची अद्याप नोंदणी करण्यात आलेली नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. मात्र, त्यावर सरकारी वकिलांनी आक्षेप घेत, गाडीत तांत्रिक बिघाड आहे, तर ती गाडी मुलाला चालवण्यासाठी का दिली? असा सवाल उपस्थित करत गाडीबाबत पूर्वकल्पना असतानाही त्याला ती चालवायला देणे गंभीर आहे, असे विद्या विभुते यांनी न्यायालयात सांगितले.
अग्रवालने यांनी मोबाइल लपवला
छत्रपती संभाजीनगर येथून अग्रवाल याला अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याची झडती घेतली. त्या वेळी त्याच्याकडे एक साधा मोबाइल आढळून आला आहे. त्यातील सिम हे १९ मेला नोंदवले आहे. अग्रवालने त्याचे मूळ मोबाइल लपून ठेवले आहेत. त्यात या गुन्ह्याच्या अनुषंगाने काही पुरावे असू शकतात,
असे पोलिसांनी नमूद केले, तर या गुन्हाबाबत तपास सुरू केला असता पोलिसांनी अग्रवाल याला फोन करून कोठे आहात, अशी विचारणा केली. त्या वेळी तो पुण्यात असतानाही त्याने आपण शिर्डीला असल्याची खोटी माहिती दिली होती, असे या गुन्ह्यातील तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी न्यायालयात सांगितले.