पुणे – ज्या ठिकाणी करोना बाधित सापडतील तेथे “मायक्रो कंटेन्मेंट झोन’ करणार असल्याचे विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले. याशिवाय कंटेन्मेंट किंवा निर्बंधांविषयीचे आदेश केवळ महापालिका आयुक्तच काढतील, असेही राव यांनी स्पष्ट केले.
शहरात जेथे “हॉटस्पॉट’ आहेत तेथे “मायक्रो कंटेन्मेंट’ झोन तयार करून आणि त्यांचा “इन्सिडेंट कमांडर’ नेमून त्यांच्यामार्फत नियंत्रण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात जे तहसील, ग्रामपंचायत आहे तेथेही कोविड केअर सेंटर्स सुरू करण्यात येणार आहेत. तसेच विलगीकरण कक्ष नसल्याने ग्रामीण आणि शहरी भागात अनेकजण गृह विलगीकरणात राहतात. त्यामुळे कुटुंब बाधित होऊ शकते. म्हणूनच या ग्रामीण भागातही संस्थात्मक विलगीकरणाची सोय करण्यात येणार असल्याचे राव यांनी सांगितले.
पोलिसांशी चर्चा करणार
मागच्यावर्षी सुरुवातीला पोलीस यंत्रणा आणि महापालिका यांच्यामध्ये संवादाचा अभाव होता. वेगवेगळे आदेश, त्यात भिन्नता असायची. परंतु आता आदेशाबाबत स्पष्टता आणली आहे. शहरात केवळ महापालिका आयुक्तच आदेश काढणार आहेत. पोलीस आयुक्तांशी आणि संबंधित यंत्रणेशी चर्चा करूनच ते आदेश काढतील, असे राव यांनी स्पष्ट केले.