Lok Sabha Election 2024। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या 7 मे रोजी पार पडणार आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 11 जागांवर मतदान पार पडणार आहे. यात सर्वात श्रीमंत उमेदवार कोण आहेत तसेच कोणत्या उमेदवाराची मालमत्ता कमी आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
तिसऱ्या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवारांच्या यादीत भाजप आघाडीवर आहे. श्रीमंत उदयनराजे भोसले आणि रणजीतसिंह निंबाळकर यांच्या नावाचा यात समावेश आहे. तर काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांची सर्वात जास्त संपत्ती आहे.
सर्वात श्रीमंत उमेदवार
– लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसने कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज यांना तिकीट दिलं आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे एकूण 342 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ज्यात त्यांची जंगम मालमत्ता 147 कोटी 64 लाख 49 हजार आणि स्थावर मालमत्ता 50 कोटी 73 लाख 59 हजार मालमत्ता आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही.
– सातारा लोकसभेचे भाजपचे उमेदवार श्रीमंत उदयनराजे भोसले व कुटुंबांची एकूण संपत्ती 2 अब्ज 96 कोटी 39 लाख 11 हजार 585 रुपये एवढी आहे.
– तर माढा येथील महायुतीचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर सर्वाधिक मालमत्ता असलेल्या उमेदवारांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत. रणजितसिंह निंबाळकरांकडे एकूण 205 कोटी रुपयांची संपत्ती आहे.त्यांची जंगम मालमत्ता 118 कोटी 25 लाख 21 हजार रुपये आणि स्थावर मालमत्ता 3 कोटी 52 लाख 35 हजार रुपये इतकी आहे.
सर्वात कमी संपत्ती असलेले उमेदवार
– तर इरफान अबुतालिब चांद, मनोहर प्रदीप सातपुते आणि अशोक ज्ञानदेव वाघमोडे हे सर्वात कमी मालमत्ता असलेले उमेदवार आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापुरातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे इरफान अबुतालिब चांद यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती आहे. त्यांच्याकडे अवघ्या 100 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर त्यांची एकूण संपत्ती फक्त 100 रुपये आहे.
– हातकणंगले लोकसभेचे उमेदवार मनोहर प्रदीप सातपुते हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. सातपुते यांच्याकडे फक्त 2000 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. मनोहर सातपुते यांची एकूण संपत्ती फक्त 2000 रुपये आहे.
– अशोक ज्ञानदेव वाघमोडे हे सर्वात कमी संपत्ती असलेल्या उमेदवारांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. अशोक ज्ञानदेव वाघमोडे हे अपक्ष उमेदवार ते माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याकडे केवळ 6 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण ?
तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर हे सर्वात श्रीमंत आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती ५,७८५ कोटी रुपये आहे. म्हणजेच या निवडणुकीत ते आतापर्यंतचे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. चंद्रशेखर हे एनआरआय डॉक्टर आहे. टीडीपीने त्यांना गुंटूरमधून उमेदवार केले आहे. चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी आंध्र प्रदेशातील सर्व लोकसभा जागांवर मतदान होणार आहे.
हेही वाचा:
अमोल मिटकरी म्हणाले,’शरद पवारांच्या धनंजय मुंडेंवरील टीकेमुळे वैयक्तिक दुःख…’