-->

अवघ्या 36 गुंठ्यात मिरची लागवडीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न

वडूज येथील महेश पवार यांची किमया; गट शेती केल्याने इतरांना झाला फायदा

वडूज – दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खटाव तालुक्‍यातील वडूज येथील युवा शेतकरी महेश उर्फ बबलू पवार यांनी 36 गुंठे क्षेत्रात मिरची लागवडीतून आतापर्यंत केलेल्या तोडीत पाच लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवले आहे. सर्व खर्च वजा जाता पाचव्या तोडीतच पाच लाखांचे उत्पन्न मिळाले असून, आणखी पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न मिळेल, अशी पवार यांची अपेक्षा आहे.

वडूज-अंबवडे रस्त्यावरील आपल्या शेतीत महेश पवार यांनी द्राक्ष, केळीसह पारंपरिक पिके घेतली आहे. खटाव तालुक्‍याला कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. शेतीतून उत्पादन खर्चही हाती येत नसल्याने त्यांनी मिरची लागवड करायचे ठरवले. त्यांनी गटशेती करायचा निर्णय घेऊन 22 जणांचा किसान क्रांती हायटेक गट तयार केला. पवार यांनी गेल्या वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बारामतीतून बायर इंदू व आरमार या वाणांचे बियाणे आणून आपल्या नर्सरीत रोपे तयार केली.

ही रोपे त्यांनी गटातील शेतकऱ्यांना दिली. वडूज, पिंपळवाडी, गणेशवाडी, कातरखटाव, डाभेवाडी, मानेवाडी आदी ठिकाणी 18 एकरमध्ये या रोपांची लागवड केली. एकरी आठ हजार रोपे लावली. एकरी सहा ट्रॉली शेणखत, दोन ट्रॉली कोंबडखत, भेसळ डोस देण्यात आले. पाच फूट अंतरावर बेड करून मल्चिंग पेपर अंथरले. त्यानंतर दीड फुटावर लागण केली. ठिबकच्या साह्याने रोपांना पाणी दिले. साधारणपणे 55 दिवसात पहिली तोडणी झाली.

गेल्या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबर व यंदा जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांमध्ये पवार यांनी 36 गुंठ्यात सरासरी पाच लाखांचे उत्पन्न मिळवले. किसान क्रांती हायटेक ग्रुपच्या बॅनरखाली कराड, सातारा या ठिकाणी व्यापाऱ्यांना मिरची विकली. सध्या 40 ते 50 रुपये किलो दर मिळत आहे. याच गटातील कातरखटाव येथील महिला शेतकरी रोहिणी बागल यांनी 50 गुंठ्यांमध्ये आठ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.

किसान क्रांती हायटेक ऍग्रो या ग्रुपमध्ये महेश पवार, डॉ. संतोष गोडसे, संजय काळे, भरत घनवट, सतीश गोडसे, सुनील सजगणे, मंगेश गोडसे, महादेव कोकरे, दत्तात्रय राऊत,तुकाराम राऊत, शिवाजी नलवडे, रोहिणी बागल, विजय गोडसे आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.