शिक्षणाधिकाऱ्यांची शाळांना अचानक भेट

पुणे -जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांनी काही शाळांना अचानक भेटी दिल्या. यावेळी त्यांनी ऑनलाइन शिक्षण, सुविधांची तपासणी केली. यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले होते.

करोनामुळे यंदाही प्रत्यक्ष शाळा सुरू न होता ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. शाळांसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या होत्या. त्यानुसार त्याची अंमलबजावणी होते का, याची पाहणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या नांदे, भुकूम, लवळे आदी भागांतील शाळांची तपासणी केली.

यात शिक्षकांची नियमाप्रमाणे उपस्थिती आहे का, पटनोंदणी पूर्ण केली आहे की नाही, ऑनलाइन शिक्षण कशा पद्धतीने सुरू आहे, शाळांची साफसफाई केली आहे का, शाळांमध्ये आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध आहेत का, वर्गखोल्यांची अवस्था याबाबतची तपासणी केली. या सर्व बाबी समाधानकारक आढळून आल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जुनी पुस्तके उपयोगात येणार
शाळांची दुरुस्ती, नवीन बांधकामे, मॉडेल स्कूल संदर्भातील इतर भौतिक सुविधा या कामांचा आवश्‍यकतेनुसार प्राधान्य देऊन कामे वेळेत पूर्ण करावी लागणार आहेत. शाळेत विलगीकरण केंद्र असल्यास प्रवेश व अन्य कामकाजासाठी शाळा निर्जंतुकीकरण करून आवश्‍यक काळजी घेऊनच शाळेचा वापर करण्याच्या सूचना पूर्वीच दिल्या आहेत. इयत्तानिहाय जुन्या पाठ्यपुस्तकांबाबत आढावा घेऊन पुस्तके संकलित करून ती पुढील विद्यार्थ्यांना वाटप होणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.