दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याबाबत भारतीय वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली – देशभरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता करोना लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. मात्र लसीकरणाबाबत सावळा गोंधळ बघायला मिळत आहे. लसीकरणासंदर्भात वैज्ञानिकांनी धक्कादायक खुलासा केला आहे. लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून दुप्पट करण्याला आमचा पाठिंबा नव्हता, याबाबत शिफारस आम्ही केलीच नव्हती असा खुलासा तज्ज्ञ गटातील तीन सदस्यांनी केला आहे.

१३ मे रोजी केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून दुप्पट करत १२ ते १६ आठवडे निश्चित केले होते. हा निर्णय वैज्ञानिकांच्या गटाने केलेल्या शिफारशींनुसार घेतल्याचे केंद्र सकरकाडून सांगण्यात आले होते.

”NTAGI च्या वैज्ञानिकांनी ८ ते १२ आठवड्यांपर्यंत अंतर वाढवण्यावर सहमती दर्शवली होती. जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील याचा सल्ला दिला आहे. पण १२ ते १६ आठवडे हे केंद्र सरकारचे आकडे आहेत. दोन डोसमधलं अंतर १२ आठवड्यांपेक्षा जास्त झालं तर १२ आठवड्यांनंतर कोणते संभाव्य परिणाम होऊ शकतात, याचा कोणताही डाटा NTAGI कडे नाही.” नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमोलॉजीचे माजी संचालक एम. डी. गुप्ते यांनी माहिती देताना सांगितले आहे.

जे. पी. मुलीयिल NTAGI मधील सदस्य यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. ”या तज्ज्ञांच्या गटामध्ये दोन डोसमधील अंतर वाढवण्याबाबत चर्चा तर झाली. पण आम्ही कधीही ते १२ ते १६ आठवडे करावे असे म्हणालो नाहीत. नेमके आकडे सांगितलेच गेले नव्हते”

दरम्यान, लसींच्या तुटवड्यामुळे असा निर्णय घेतल्याचा आरोप केंद्रावर झाला होता. मात्र, हा निर्णय लसींच्या तुटवड्यमुळे नसून तज्ज्ञ वैज्ञानिकांच्या शिफारशींनुसार घेण्यात आला आहे, असे केंद्रा सरकारकडून त्यावेळी सांगण्यात आले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.