पर्यटकांना पडतेय मक्‍याच्या कणसाची भुरळ

पुणे -पावसाच्या सरी आणि गार हवा अशा वातावरणात मक्‍याचे भाजलेले कणीस खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पर्यटनस्थळ आणि मक्‍याचे कणीस हे समीकरणच आहे. त्यात निर्बंध शिथिल झाल्याने उद्याने, बागा, टेकड्या अन्य पर्यटनस्थळी नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच मक्‍याच्या कणसाला मागणी वाढली आहे. घाऊक बाजारातही किलोमागे 4 रुपयांची वाढ झाली आहे, तर किरकोळ बाजारात भाजलेल्या कणसाची 30 रुपयांप्रमाणे विक्री केली जात आहे.

ढगाळ वातावरणामुळे सध्या हवेत गारवा आहे. त्यात रोजच पाऊस हजेरी लावत आहे. हॉटेल सुरू झाली आहेत. त्यामुळे मक्‍याच्या कणसाला मागणी वाढली आहे. मक्‍याच्या कणसाला मागणीही मर्यादित होती. त्यामुळे सुमारे 15 दिवसांपूर्वी मक्‍याच्या कणसाला घाऊक बाजारात 8 ते 12 रुपये भाव मिळत होता.

मात्र, आता मागणी वाढल्याने किलोचा दर 12 ते 16 रुपये झाला आहे, अशी माहिती व्यापारी पांडुरंग सुपेकर आणि माऊली आंबेकर यांनी दिली. सध्या आवकेच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने भाववाढ झाली आहे. बाजारात खेड, मंचर, बारामती, कराड आणि नाशिक येथून 700 ते 800 पोत्यांची आवक होत आहे.

गतवर्षी शेतकऱ्यांचे नुकसान
मागील वर्षभर मक्‍याच्या कणसाला मागणी असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यावेळीही बाजार बंद राहील, या भीतीपोटी अनेक शेतकऱ्यांनी मक्‍याच्या कणसाची लागवड केली नाही. परिणामी लागवड क्षेत्रात सुमारे 50 टक्‍क्‍यांनी घट झाली. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत आवक कमी होत आहे. नियमित परिस्थितीत यावेळी बाजारात सुमारे 1800 ते 2000 पोत्यांची आवक झाली असती, असे आंबेकर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.