पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरात सोसाट्याच्या वारा आणि मेघगर्जनेसह शुक्रवारी (दि. १०) मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर झालेल्या या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. दुपारी अचानक ढग दाटून आले आणि सायंकाळी साडेचार वाजता पावसाला सुरुवात झाली आणि तासभर मुसळधार पाऊस बरसला. तर, येत्या १५ मे पर्यंत अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली. त्यानुसार शुक्रवारी (दि. 10) दुपारी शहरात पावसाने हजेरी लावली.
पिंपरी चिंचवड शहरात सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. तत्पूर्वी दुपारपासून ढग दाटून आले होते. तसेच सोसाट्याचा वारा सुटला होता. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांच्या कामाचा खोळंबा झाला. गुरुवारीही सायंकाळी ढग दाटून आले होते. तसेच जोरदार हवाही होती. मात्र, पाऊस पडला नाही. शुक्रवारी मात्र, वाऱयासह पावसाने हजेरी लावली.
गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हापासून नागरिकांची सकाळच्या वेळी सुटका होत आहे. दुपारी तसेच सायंकाळी वारे वाहत असल्याने थंडावा जाणवत आहे. त्यातच शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. तर, येत्या बुधवारपर्यंत (दि. १५) पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह तर, तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
पावसामुळे कमाल आणि किमान तापमानाताही काहीशी घट झाली असून शुक्रवारचे चिंचवडचे कमाल तापमान ४० अंशावर होते. तर, किमान २५ अंश होते. पाऊस पडून गेल्यावर आकाश निरभ्र होते.