पौड – पुणे ग्रामीण पोलीस दलातील पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार माधवराव यादव यांनी गुन्ह्यांचा तपास उत्कृष्ट रीतीने करून अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्याबद्दल पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.
मुळशी तालुक्यात गुन्हेगारी स्वरूपाच्या अनेक घटना सतत घडत असतात. मुळशी धरण परिसरात दरी डोंगर भागात अनेक मृतदेह आणून टाकले जातात.
या गुन्हांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पौड पोलिसांसमोर असते. पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असे गुन्हे उघडकीस आणत आरोपींना जेरबंद केले आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलातील सर्व पोलीस स्टेशनपेक्षा अतिशय चांगली कामगिरी केल्याबद्दल अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते मनोजकुमार यादव यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे तसेच पुणे ग्रामीण पोलीस दलातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.