बिजवडी – चालू हंगामात पाऊसकाळ कमी झाला आहे. उजनी धरणाच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांना अभूतपूर्व संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी उजनीच्या पाण्याचे नियोजन व्हायला हवे, असे मत राज्याचे माजी सहकार आणि संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी प्रभातशी बोलताना व्यक्त केले.
पाटील म्हणाले, मागील हंगामात पाऊसकाळ चांगला झाला होता. उजनी पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे उजनीतील पाणी अजूनपर्यंत टिकून राहिला; मात्र या हंगामात पाऊस कमी झाल्याने उजनी भरले नाही. उजनीच्या पाण्यावर पुणे, अहमदनगर, आणि सोलापूर जिल्ह्यातील पंचवीस पेक्षा जास्त साखर कारखाने चालतात. अनेक औद्यगिक वसाहती याच पाण्यावर चालतात.
सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील शेती आणि पिण्याच्या पण्यासाठीही उजनीच्या पाण्याचा वापर केला जात आहे. त्यासाठी पाण्याची उपलब्धता ही पुढील जुलैपर्यंत टिकवावी लागणार आहे. आजच उजनी 57 टक्क्यांवर आले आहे. त्यासाठी राज्य सरकारने पाण्याचे नियोजन करावे. यासाठी आम्ही सरकारकडे कागदोपत्री कागद पत्र दाखल केली आहेत. त्यावर दाखल घेतली जाईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
पाटील म्हणाले, सध्या उजनीच्या पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे. उजनीचे पाणी आज पिण्यासाठी योग्य नसल्याचे सांगतात. आम्ही मागील चारपाच दिवसापूंर्वी उजनीच्या पाण्याची पाहणी केली असता पाण्याने रंग बदलला असल्याचे दिसत आहे, तर पाण्याची उग्र दुर्गंधी ही येत असल्याचे जाणवले आहे. त्या आम्ही देशाचे केंद्रीय मंत्री यांनाही या बाबत माहिती दिली आहे. त्याबाबत उपाय करावेत, अशी मागणी केली आहे.
पुढील काही महिन्यांत पाण्याची कमतरता भासणार आहे. पिण्यासाठी, शेतीसाठी, जनावरांच्या चाऱ्यासाठी पाण्याची आवश्यकता भासणार आहे. तरी त्याचे नियोजन आत्ताच करावे लागणार आहे. जलसंपदा मंत्री हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना याबाबत माहिती देऊन उपाययोजना करणेबाबत निवेदन देणार आहोत. येणारा काळ भयानक आहे पाणी जपून वापरावे असेही आवाहन पाटील यांनी केले आहे.