कोयनानगर – पाटण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि आठ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, बुधवारी सरपंचपदांसाठीचे 50 आणि सदस्यपदांसाठीचे 200 अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे सरपंचपदांसाठी 39, सदस्यांसाठी 218 आणि पोटनिवडणुकांसाठी दोन, असे एकूण 259 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याची माहिती तहसीलदार रमेश पाटील यांनी दिली. दरम्यान, यापैकी नऊ ग्रामपंचायतींमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई गटाने विजयी सलामी दिली आहे. पाटण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व 24 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत.
पोटनिवडणुका जाहीर झालेल्या 24 गावांपैकी फक्त आठ गावांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, उर्वरित 16 गावांमधील पदे रिक्त राहिली आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचपदांचे 50, तर सदस्यपदांचे 200 अर्ज मागे घेण्यात आले. सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या 18 गावांमध्ये सरपंचपदांसाठी 39, सदस्यांच्या 106 जागांसाठी 218 आणि पोटनिवडणुकीत एका सदस्यपदासाठी दो,न असे एकूण 259 उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत. सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या उर्वरित आठ गावांमध्ये एक सरपंचपद रिक्त राहिले आहे. उर्वरित प्रत्येक जागेसाठी एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने गमेवाडी, गुंजाळी,
नवसरवाडी, डावरी, उधवणे, गव्हाणवाडी, चौगुलेवाडी, येराडवाडी या गावांमध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले आहेत. किल्ले मोरगिरी आणि जमदाडवाडी येथे फक्त सरपंचपदांसाठी निवडणूक होणार असून ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील गटाने मोठा विजय मिळवला आहे. पोटनिवडणुकीत केवळ सोनवडे गावात सात उमेदवारी अर्ज दाखल होते. माघारीनंतर आता केवळ एका प्रभागात दोन उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीसाठी रविवारी (दि. 5 नोव्हेंबर) मतदान आणि सोमवारी (दि. 6 नोव्हेंबर) मतमोजणी होणार असल्याची माहिती रमेश पाटील यांनी दिली.
========================