कराड – कराड तालुक्यात महत्त्वपूर्ण असलेल्या रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या दिवशी बुधवारी सत्ताधारी डॉ. अतुल भोसले गटाच्या समर्थकांनी विरोधी आ. पृथ्वीराज चव्हाण गटावर सरशी केली आहे. भोसले समर्थकांच्या कृष्णा विकास आघाडीच्या सात जागा बिनविरोध झाल्या असून, इतक्या जागा एकाच वेळी बिनविरोध होण्याची गेल्या 35 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे.
रेठरे बुद्रुक हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव समजले जाते. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत सरपंचपदासह 18 जागांसाठी 92 अर्ज दाखल झाले होते. या निवडणुकीत सुरुवातीपासून भोसले गटाला अडचणीत आणण्याचे प्रयत्न विरोधी गटाने सुरू केले होते.
मात्र, अर्ज माघारीच्या दिवशी भोसले गटाने सात जागा बिनविरोध करत, विरोधकांच्या प्रयत्नांना खीळ घातली आहे. विठ्ठल वॉर्डमधून शरद नामदेव धर्मे, मारुती वॉर्डमधून रुक्साना गुलाब मुल्ला, शिवनगर वॉर्डमधून संग्राम दिलीप पवार, संगीता शिवाजी सावंत, सचिन अरुण जाधव, लक्ष्मी वॉर्डमधून शर्मिला संतोष मोहिते, भाग्यश्री रोहित पवार, हे सत्ताधारी कृष्णा विकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. शिवनगर वॉर्डमधील सर्व जागांवर सत्ताधारी गटाने कब्जा केला आहे अर्ज माघारीच्या दिवशीच सात जागांवर यश मिळाल्याने भोसले गटाचा उत्साह दुणावला आहे, तर आ. पृथ्वीराज चव्हाण गटात निराशेचे वातावरण आहे.