विद्यार्थ्यांनी मराठी शाळेचे महत्त्व सांगत दिल्या घोषणा
परिंचे – पुरंदर तालुक्यातील परिंचे येथील जिल्हा परिषद शाळेत बैलगाडीतून नवागत विद्यार्थ्यांची गावामधे ढोल लेझीमच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी मराठी शाळेचे महत्त्व सांगत घोषणा दिल्या. यावेळी शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित केला होता. सुंदर रांगोळी, शालेय सजावट करून सुशोभीकरण करण्यात आले होते.
केंद्रप्रमुख राजेंद्र कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये एकूण सात स्टॉल लावण्यात आले होते. याद्वारे विद्यार्थी विकासाच्या कोणत्या टप्प्यावर आहे, याचे मूल्यमापन करून विद्यार्थ्याच्या भाषिक, शारीरिक, भावनिक, गणिती क्रिया आदी कृतीतून त्याचे मूल्यमापन केले जाणार असल्याचे मुख्याध्यापिका प्रतिमा गुरव यांनी सांगितले. यावेळी भुजंगराव जाधव, दिगंबर गुरव, बाबुराव जाधव, अशोक घारमळकर, अशोक कुंभार आदी ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
नवागत विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन त्यांना औक्षण करण्यात आले. विविध कृती करायला सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी पालकांनी खूप सहकार्य केले. गुणशेखर जाधव यांनी विद्यार्थ्यांना फेटे बांधून कार्यक्रमाला शाही रूप प्राप्त करून दिले.तसेच शेतकरी रमेश कदम यांनी स्वतःची बैलगाडी मिरवणुकीसाठी उपलब्ध करून दिली.
माजी सरपंच समीर जाधव, दीपक गोडबोले, शिवाजी जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मंजुश्री जाधव, अंगणवाडी सेविका ज्योती गुरव, जयश्री गोडबोले, हेमा जाधव, अलका कदम, बेबी जाधव यांनी या उपक्रमाला योगदान दिले. सहशिक्षका रुपाली जगदाळे यांनी आभार मानले.