माजी आमदार अशोक टेकवडे यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित
दौंड – महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय तथा पुरंदर-हवेलीचे प्रभावशाली माजी आमदार अशोक टेकवडे यांनी मुलगा अजिंक्य टेकवडे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम करून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या या निर्णयाने पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला हा धक्का मानला जात आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी माजी आमदार टेकवडे यांनी पक्षांतर्गत होणाऱ्या कुरघोडीसह गटबाजीला व सततच्या घुसमटीला कंटाळून राष्ट्रवादीच्याच मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार देखील केली होती; मात्र त्या तक्रारींची पक्ष श्रेष्ठींनी साधी दखल न घेतल्याने नाराज झालेल्या टेकवडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला असावा अशीच चर्चा राजकीय
वर्तुळात आहे.
अशातच त्यांचे पुत्र तथा बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अजिक्य टेकवडे यांनी देखील आपल्या अनपेक्षित पदाचा काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता. त्यातच सोशल मीडियावरही त्यांनी आपल्या पदाचा उल्लेख न करता युवा सहकारी असा उल्लेख करत या फुटीचे संकेत देखील दिले होते; मात्र या फुटीच्या राजकारणामुळे राष्ट्रवादीचा एक मोठा गट टेकवडे यांच्या सोबत जाणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. दरम्यान, टेकवडे यांच्या पक्षप्रवेशाने भाजपने बेरजेचे राजकारण केले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील गटबाजी व सातत्याने होणाऱ्या अन्यायाला कंटाळून भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला आहे; मात्र प्रवेशाबद्दल कोणतीही अपेक्षा ठेवली नाही. याउलट पक्ष प्रवेशामुळे पुरंदरच्या विकासाला गती देता येणार आहे.
-अशोक टेकवडे, माजी आमदार
गुरुवारी होणार पक्षप्रवेश
पुण्यातील बालगंधर्व येथे होणाऱ्या कार्यक्रमात गुरुवारी (दि. 18) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत टेकवडे पिता-पुत्र हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत
मोठे मासे गळाला
भाजपचे मिशन बारामती यशस्वी होताना दिसत आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना रोखण्यासाठी भाजपकडून बारामती मतदारसंघाचे अनेक दौरे केले जात आहेत. यातून भाजपला राष्ट्रवादीचा मोठा मासा गळाला लागला आहे. राष्ट्रवादीचे पुरंदर हवेलीचे एकमेव माजी आमदार अशोक टेकवडे कमळ हाती घेणार आहेत. 2004 ते 2009 या काळात टेकवडे हे आमदार होते.