उपमुख्यमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना सल्ला ः पेठमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन
सोरतापवाडी – गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने हातात हात घालून काम केले पाहिजे. तरुण पिढी कुठे चुकत असेल तर तशा सूचना ज्येष्ठांनी द्याव्यात. पण गावच्या विकासात गटातटाचे राजकारण अजिबात करू नका, असा मोलाचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
पेठ (ता. हवेली) ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण, विविध विकासकामांचे उद्घाटन व महाराष्ट्रात प्रथमच पोलीस पाटील कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, हवेली तालुकध्यक्ष दिलीप वाल्हेकर, जिल्हा परिषद सदस्या किर्ती कांचन, पेठ गावचे सरपंच सूरज चौधरी, उपसरपंच जयश्री चौधरी, तुळशिराम चौधरी, अमित कांचन, ज्येष्ठ नेते सूरजश घुले, उद्योगपती गुलाब चौधरी, काळुराम चौधरी, ग्रामविकास अधिकारी नंदकुमार चव्हाण, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी यांसह तालुक्यातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, पेठ गावच्या नुतनीकरण इमारतीचे उद्घाटन करताना आनंद होत आहे. यापुढे पेठगावच्या विकासाला गती मिळणार असुन पेठगावच्या विकासासाठी मी, खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार सगळेजण निधीची अडचण येऊ देणार नाही. गावच्या विकास कामांमध्ये गाव कारभाऱ्यांचे अत्यंत महत्त्वाचं योगदान असते, त्यांना गावकऱ्यांनी साथ दिली पाहिजे. या इमारतीच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या विकासाची कामे सूरज चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अधिक वेगाने केली पाहिजेत. योग्य आणि कायदेशीर काम घेऊन आलेला ग्रामस्थ रिकाम्या हाताने जाणार नाही यासाठी सूरज व त्यांच्या सहकाऱ्यांनी काम केले पाहिजे. यावेळी सूरज चौधरी यांनी गावात केलेल्या विकास कामांची माहिती अजित पवार यांना दिली.
त्या वृत्ताची जोरदार चर्चा…
पूर्व हवेलीतील एका सोसायटीमध्ये आपल्या गटाची सत्ता खेचून आणण्यासाठी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, एक माजी सरपंच व सोसायटीच्या माजी अध्यक्ष्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसत भाजपला छुपा पाठिंबा देत विरोधी गटाला सहकार्य केले होते. त्याबाबत दैनिक प्रभातने छुपी बंडखोरी कोणाच्या पथ्यावर पडणार? या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावृत्ताची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पेठ येथील सभेत पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्याची चर्चा हवेली तालुक्यात चांगलीच रंगली.
सरपंचाच्या कामाचे तोंडभरून कौतुक
पेठ गावचे सरपंच सूरज चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या डिजिटल ग्रामपंचायतीच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी संपूर्ण इमारतीची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. इमारतीच्या पाहणीनंतर ग्रामस्थांसाठी त्यांनी पाऊण तास वेळ दिला. यावरून अजितदादांना ग्रामपंचायतीचे नूतनीकरण आवडले असल्याची चर्चा पूर्व हवेलीत सुरू झाली आहे.